काँग्रेस वर्किंग कमिटीत अशोक चव्हाण, मुकुल वासनिक; प्रणीती शिंदेंना एआयसीसीवर स्थान
नवी दिल्ली | पक्ष संघटनेत सर्वोच्च असलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीत महाराष्ट्रातील नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि माजी खासदार मुकुल वासनिक (Mukul Wasnik) यांना स्थान देण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ३९ सदस्यांची वर्किंग कमिटी, तसेच निमंत्रित, प्रभारी यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. वर्किंग कमिटीत सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी वाढ्रा, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, के. सी. वेणूगोपाल आदींचा समावेश आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या लढतीत खरगे यांच्याविरोधात निवडणूक लढविलेले खासदार शशी थरूर यांनाही स्थान देण्यात आलेले आहे.
कायम निमंत्रक १८ असून, त्यात मुंबईचे माजी महापौर चंद्रकांत हंडोरे यांना स्थान देण्यात आले आहे. ३२ प्रभारी असून, त्यात महाराष्ट्रातील माणिकराव ठाकरे, रजनी पाटील यांचा समावेश आहे. शिवाय युवा नेते कन्हैया कुमार यांचाही समावेश करण्यात आला आहे. विशेष निमंत्रकांच्या नऊजणांच्या यादीत महाराष्ट्रातील आमदार यशोमती ठाकूर आणि आ. प्रणीती शिंदे यांना घेण्यात आले आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये २३ सदस्यांची वर्किंग कमिटी बरखास्त करून ४७ जणांची सुकाणू समिती नेमली होती. नव्या नेमणुकांमुळे सुकाणू समितीचे अस्तित्व संपले आहे.
भारत जोडो यात्रेची महाराष्ट्रातील जबाबदारी अशोक चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत अशोक चव्हाण यांना स्थान देण्यात येत आहे. वर्किंग कमिटीत त्यांची नेमणूक झाल्याने त्यांचे पक्षातील महत्त्व वाढले आहे. मुकुल वासनिक पक्षात प्रदीर्घ काळ केंद्रीय जबाबदाऱ्या पार पाडत आले आहेत.