“गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी!” 2018 च्या चॅम्पियन टीममधून 11 खेळाडू बाहेर, चौघांची कारकीर्द संपली!
Asia Cup 2023 Team India Squad : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आशिया कपसाठी सज्ज झाली आहे. या स्पर्धेत जाहीर करण्यात आलेल्या संघात केएल राहुल आणि इशान किशन हे यष्टिरक्षक आहेत. कर्णधार रोहित शर्मा शिवाय विराट कोहली, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा हे फलंदाज आहेत. तर हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि शार्दुल यांचा अष्टपैलू म्हणून समावेश करण्यात आला आहे.
त्याचबरोबर वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्याकडे असेल. 17 सदस्यीय संघात कुलदीप यादवच्या रूपाने एका फिरकीपटूला स्थान मिळाले आहे. ही स्पर्धा 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे.
2018 मध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने शेवटचा आशिया कप जिंकला होता. त्या संघातील 11 खेळाडूंना आता वगळण्यात आले आहे. 2 खेळाडूंनी निवृत्तीही घेतली आहे.
शिखर धवनशिवाय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, दिनेश कार्तिक आणि केदार जाधव हे टीम इंडियाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्याचवेळी, खलील अहमद, युझवेंद्र चहल, दीपक चहर, महेंद्रसिंग धोनी, मनीष पांडे, अंबाती रायडू आणि सिद्धार्थ कौल हे गेल्या आशिया कपमध्ये दिसलेले होते पण या संघाचा ते भाग नाहीत.