भारताच्या कयनन चेनाईने पुरूष ट्रॅप शुटिंगमध्ये जिंकले कांस्य पदक
Asian Games 2023 : भारताचा नेमबाज कयनन चेनाईने आज एशियन गेम्स 2023 मधील वैयक्तिक 50 मीटर ट्रॅप शुटिंग स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. पुरूष सांघिक ट्रॅप शुटिंग स्पर्धेत भारताच्या संघाने आज सकाळी विक्रमी कामगिरीसह सुवर्ण पदक जिंकून दिले होते. त्या संघात कयनन चेनाईचा देखील समावेश होता. आता त्याने वैयक्तिक ट्रॅप शुटिंग प्रकारात कांस्य पदक जिंकून एका दिवसात दुसरे पदक आपल्या खिशात टाकले.
पुरूष वैयक्तिक ट्रॅप शुटिंगच्या अंतिम फेरीत भारताचे कयनन आणि झोरावर सिंग संधू यांनी स्थान पटकावले होते. मात्र झोरावर सिंग सहाव्या फेरीनंतर पदकाच्या रेसमधून बाहेर पडला. दरम्यान, चांगल्या सुरूवातीनंतर आपली लय गमावलेल्या कयननने नंतर पिछाडी भरून काढत दुसऱ्या स्थानी झेप घेतली होती. त्याने सलग दहा शॉट्स ऑन टार्गेट मारले होते.
मात्र तो सहाव्या फेरीपासून पिछाडीवर पडायला सुरूवात झाली. अखेर आठव्या फेरीत 40 पैकी 32 शॉट्स ऑन टार्गेट मारत त्याने कांस्य पदक निश्चित केले. चीनच्या यिंगने 50 पैकी 46 शॉट्स ऑन टार्गेट मारत सुवर्ण पदकाची कमाई केली. तर कुवैतच्या राशिदी अल तलालने 50 पैकी 45 शॉट्स ऑन टार्गेट मारत रौप्य पदक पटकावले.
भारताच्या मनिषा कीरने देखील महिला वैयक्तिक ट्रॅप शुटिंगच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र तिला पदक जिंकण्यात अपयश आले.