जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर प्राणघातक हल्ला, प्रकृती गंभीर

टोकियो | Attack On Shinzo Abe – जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी असलेल्या एनएचकेच्या पत्रकाराने बंदुकीच्या गोळीसारखा आवाज ऐकला आणि आबे यांना रक्तस्त्राव होताना दिसला. हा हल्ला नारा शहरात झाला. जपानची वृत्तसंस्था एनएचकेने यासंदर्भात माहिती दिली आहे. पश्चिम जपानमधील नारा शहरात भाषणादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि ते खाली कोसळले. ते संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीपूर्वी एका सभेला संबोधित करत होते.
शिंजो आबे हे नारा शहरातील एका रस्त्यावर भाषण करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. दरम्यान या हल्ल्यावेळी बंदुकीच्या गोळीसारखा आवाज ऐकू आला आणि घटनास्थळी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले, असं एनएचकेने सांगितलं. घटनास्थळावरील एनएचकेच्या पत्रकाराने सांगितलं की, आबे यांच्या भाषणादरम्यान त्यांना सलग दोन गोळ्यांचे आवाज ऐकू आले आहेत.
आबे यांना गोळी लागल्याने हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितले जात आहे. घटनास्थळावरील एका व्यक्तीने सांगितलं की त्याने बंदुकीच्या गोळ्या ऐकल्या आणि आबे यांना रक्तस्त्राव होत असल्याचं पाहिलं. गोळी लागल्याने ते बेशुद्ध झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं.
दरम्यान, पोलिसांनी सांगितलं की, एका संशयिताला अटक केली असून, त्याच्याकडून एक बंदूक जप्त करण्यात आली आहे. संशयिताची चौकशी करण्यात येत आहे. या संशयिताने भाषणादरम्यान आबे यांच्यावर मागून गोळी झाडल्याचं सांगण्यात येत आहे. संशयित हल्लेखोर ४० वर्षांचा आहे.