एक तरी ओवी अनुभवावी

!!जय श्री राम!!
!!ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन!!
!!अ.१३वा.”शमन-दमन अत्यावश्यक”!!
आपली “ज्ञानेंद्रीये” ज्ञान ग्रहणाचे दरवाजे आहेत. इथे ज्ञान घेताना मोहात इंद्रीये पडू शकतात. मनाला तोच मोह आकर्षित करतो. म्हणून मनाला मोहापासून दूर ठेवण्यासाठी मनावर नियंत्रण करणे ज्याला “शमन” असा शब्द वापरला जातो.तर इंद्रीयांनी मोहवश होऊ नये, म्हणून शरीरेंद्रीयांवर मनाचा अंकुश ठेवणे, याला “दमन”असा शब्द वापरला जातो.
म्हणून माऊलींनी श्लोक क्रमांक ७वा याचे अखेरीस पुन्हा एकदा योगमार्गाची गरज सांगितली आहे. या ठिकाणी ओवींचे विवरण करण्यापूर्वी एक विनंती करतो. वाचकांनी भावार्थ वाचनाचे आरंभी ओवींचे वाचन मन लाऊन करा, माऊलींच्या ओव्या कठीण आहेत. हे मला माहिती आहे. पण ज्ञानेश्वरींची गोडी लागावी हा माझा हेतु आहे. ” घरोघरी ज्ञानेश्वरी” हे कोणत्याही माऊलीभक्ताचे स्वप्न असते. माझे सुध्दा हेच स्वप्न आहे. आता विषयांतर न करता ओवी वाचनास आरंभ करूया.
आणि इसाळु जैसा घरा! कां दंदिया हतियेरा! न विसंबे भांडारा !
बध्दकु जैसा!!५०१!!
एकलौतिया बाळका-!वरि पडौनि ठाके अंबिका! मधुविषी मधुमक्षिका!
लोभिणी जैसी!!५०२!!
अर्जुना जो यापरी !अंत:करण जतन करी!
नेदी उभे ठाको द्वारी!इंद्रीयांचा!!५०३!!
म्हणे काय बागुल ऐकेल!हे आशा सियारी देखैल! तरि जीवा टैंकेल!
म्हणोनि बिहे!!५०४!!
बाहेरि धीट जैसी!दाटुगा पति कळासि!
करी टेहाळणी तैसी!प्रवृत्तीसी!!५०५!!
सचेतनि वाणेपणे!देहासकट आटणे!
संयमावरी करणे!बुझोनि घाली!!५०६!!
मनाचां महाद्वारी-!प्रत्यहाराचिया ठाणांतरी!
जो यम नियम शरीरी!जागवी उभे!!५०७!!
आधांरीं नाभीं कंठी!बंधत्रयाचि घरटी!
चंद्रसूर्यसंपुटी!सुये चित्त!!५०८!!
समाधीचे सेजेपासीं!बांधोनि घाली ध्यानेसिं!
चित्तचैतंन्यसमरसी!आंतु रचे!!५०९!!
अगा अंत:करणनिग्रहो जो!तो हा हे जाणिजो!
हा आणि तेथ विजयो !ज्ञानाचा पै!!५१०!!
जयाचि आज्ञा आपण !शिरी वाहे अंत:करण !
मनुष्याकारे जाण!ज्ञानचि तो!!५११!!
भावार्थ : १) ज्याप्रमाणे ब्रह्मसमंध अथवा डुख धारणारा नाग आपले घर विसरत नाही. योध्दा पुरूष चोविस तास आपले शस्त्र सज्ज ठेवतो त्याप्रमाणे अंत:करणाचा पाहरा तो ज्ञानेंद्रींयावर ठेवतो. म्हणजे इंद्रीयांना मोहवश होऊ देत नाही.
एकुलते एक बालकाची काळजी त्याची आई सतत घेते. मधमाशीचे लक्ष साठवलेल्या पोळ्यावर असते तसे मनाचे नियंत्रण इंद्रीयांवर हवे. ज्ञानी माणूस इंद्रीयांना भिती घालतो.अंधारात बागुलबुवा असतो. मोहाची चेटकीण पकडून नेते. देवाची भिती अध:पतनाची भिती माणसाला जागृत ठेवते.
भटकभवानी बाईचा नवरा तिची टेहाळणी करतो तिचे हातून चूक होणार नाही याची काळजी प्रसंगी घरात कोंडून घालतो. तसे आपले शरीर वाईट व्यसन आत सापडणार नाही, याची काळजी साधक घेत असतो.
सतत जागृत राहण्याची गरज लक्षात घेता देहाला वैचारीक बंधने हवीत. स्वैराचार नकोच.म्हणून संयम हवा, असे माऊलींचे सांगणे आहे.मनाचे महाद्वारातून कोणी यावे कोणी येऊ नये, यासाठी अष्टांग साधनेत प्रत्यहार सांंिगतला. आहे. इंद्रीयांचे लाड न करणे म्हणजे प्रत्यहार.यासाठी इंद्रीये दमन व मनावर नियंत्रण हवे.
इथे माऊली षटचक्र विचार मांडतात मूलाधार,मणीपूर,विषीष्टि ही अनुक्रमे गुदद्वारा जवळ,बेंबी जवळ,आणि घशात असणारी चक्रे नियंत्रीत करण्यासाठी जालंदर ओडियाण,मूळबंधांचा वापर करावा असे माऊलींचे सांगणे आहे तसेच डावी नागपुडी चंद्रनाडी उजवी नागपुडी म्हणजे सूर्यनाडीतील श्वसन पाहावे म्हणजे अनुलोम विलोम करावा.
ध्यान धारणा समाधी आध्यात्मिक प्रगतीला अत्यावश्यक आहे.याने चित्ताला समाधान मिळते.
मनावरील विजय महत्वाचा आहे.मी करणार नाही वाईट कृती विचारांना दूर ठेवावे. असा ज्ञानी मनुष्य आध्यात्मिक सिध्द अवस्थेत पोहचतो.
!!मना पाप संकल्प सोडोनि द्यावा !मना संकल्पजीवी धरावा!!