अग्रलेखराष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

एक तरी ओवी अनुभवावी

-प्रकाश पागनीस

।।जय श्री राम।।
।।ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन।।
।।अ.१३वा. श्रीकृष्णांना
प्राप्त करा।।

श्री कृष्ण स्वत:च मी अप्राप्त कसा आहे. हे सातव्या अध्यायात सांगतात.
हजारो मनुष्यांमध्ये कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. आणि त्या प्रयत्न करणारे योगींपैकी एखादाच मत्परायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो.
(श्लोक क्रमांक ३अ.७वा.)
अशा भगवंतांच्या साधनेसंबंधी अ.१३ वा. श्लोक १० वा. काय म्हणतो पहा.
मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी।
विविक्त देशसेवित्व मरतिर्जनसंसदि।।१०।।
कठीण शब्द :- जनसंसदी : विषयासक्त मनुष्यांचा समूह. अरति: -प्रेम नसणे.
भगवंत म्हणतात :- मज परमेश्वरामध्ये अनन्ययोगाने अव्यभिचारी भक्ती एकांतवासात शुद्ध ठिकाणी राहण्याचा स्वभाव आणि विषयासक्त मनुष्यांचा सहवास न आवडणे या खरोखरच भगवत्‌‍ प्राप्तीच्या साधना नव्हेत काय?

निरुपण : व्यभिचार हा मनाची अस्थिरता दर्शवणारा शब्द आहे. भगवंत आहे.हे त्या अज्ञानी भक्ताला समजते. पण भगवंतांचे नाम, रूप, उपासना या विषयी तो अज्ञानी असतो. खरे म्हणजे एकच भगवंत विविध नावे, रूपे यांतून साकारत असतो. पण भक्त यथार्थाने भगवंतांना न जाणल्याने शनिवारी मारुतीला रुईची माळ घालतो, रविवारी खंडोबावर भंडारा-खोबरे उधळतो, सोमवारी शंकराला बेल वाहतो.अशा रीतीने मानसिक एकाग्रता नसणारी भक्ती याला व्यभिचार भक्ती म्हटले जाते. खरा भक्त एकेश्वरवादी असतो.
माऊली म्हणतात :
अनंतरुपे अनंतवेषे देखीला म्या त्यासी।
बापरखुमादेवीवरु खूण बाणली केसी।।
माउलींनी आराध्यदैवत म्हणून पंढरीच्या विठ्ठल-रखुमाई यांना स्वीकारले होते.
कोणत्याही देवतेचे पूजन करावे. मनात आराध्यदैवत स्मरावे.
आकाशात पतीत तोयं यथा गच्छती सागरम्‌‍ सर्व देवो नमस्कार: केशवं प्रती गच्छती।।
पावसाचे पाणी अनेक नद्यांचे पात्रांतून सागराला मिळते त्याप्रमाणे अनेक देवतांना अर्पण केलेली उपासना भगवान श्री विष्णूंना पोहचते.
एकांतात केलेल्या साधनेला तपाचरण म्हणतात. ही साधना परिपूर्ण असते. इथे आपण मोहमायेतून मुक्त असतो.
सत्त्वगुणींपेक्षा रजोगुणी तमोगुणींची संख्या जास्त असते म्हणून गप्पांचा मेळा, विषयासक्त व्यसनींपासून दूर राहून साधना करावी.
नाही तर रामदास स्वामी म्हणतात तसे
ऐसे कैसे झाले भोंदू।
कर्म करोनी म्हणती साधू॥

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये