‘वीज चोरी होत असलेल्या ठिकाणी…’; ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचं मोठं विधान

मुंबई : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देशातील कोळसा संकटाचा उल्लेख करत राज्यात आगामी काळात होणाऱ्या भारनियमनाबाबत मोठं विधान केलं आहे. “सध्या वीजेची मागणी २९ हजार मेगावॅटपर्यंत गेलीय. त्यात कोळशाचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात वीज गळती, वीज चोरी होत असलेल्या ठिकाणी लोडशेडिंग करून आम्ही सावरण्याचा प्रयत्न करत आहोत,” अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे. ते औरंगाबादमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.
यावेळी नितीन राऊत म्हणाले, “देशात मोठ्या प्रमाणात कोळशाचं संकट तयार झालं आहे. त्यात उष्णतेचा उष्मांक मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मी तिन्ही कंपन्यांची बैठक घेऊन चर्चा केली. सणउत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होत आहेत. त्यामुळे वीजेची मागणी आजच्या घटकेला २९ हजार मेगावॅटपर्यंत गेलीय. असं असताना उरणमधील गॅस प्लँटचा पुरवठा ५० टक्के आहे. कारण केंद्र सरकारकडून एपीएमचा पुरवठा करारानुसार होत नाही. त्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नाही.”
“कोयना हायड्रोप्रोजेक्टमध्ये आमच्याकडे ७ टीएमसी पाणीसाठा आलेला होता. मात्र, आम्ही जलसंपदा मंत्र्यांना विनंती केली. त्यांनी आम्हाला १० टीएमसी पाणी आणखी दिलं. अशाप्रकारे आम्हाला १७ टीएमसी पाणी मिळालं. पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प चालवला तर दरदिवशी आम्हाला १ टीएमसी पाणी लागते. त्यामुळे तेथे १७ दिवसांचीच वीजनिर्मिती उपलब्ध आहे,” अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे.
नितीन राऊत पुढे म्हणाले, “कोळशावरील प्रकल्पांची वीज निर्मिती क्षमता १०० टक्के मिळाली तर याला बराच आधार मिळू शकतो. परंतु अलिकडच्या काळात दुसऱ्यांदा देशावर कोळसा संकट आहे. काही ठिकाणी कोळसा उपलब्ध आहे, पण रेल्वेच्या रॅक मिळत नाहीत. यासंबंधी देखील आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करतो आहे. आम्ही आयात केलेला कोळसा विकत घेण्याचाही विचार करत आहोत.”