विधानसभेसाठी आठवले गटाची ८ ते १० जागांची मागणी
लोकसभेच्या जागा वाटपात आरपीआय आठवले गटाला एकही जागा मिळाली न्हवती, मात्र विधानसभेला राज्यात ८ ते १० जागा लढवून त्या निवडून आणण्याचा निर्धार आम्ही केला असल्याचे आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोणावळ्यात बोलताना सांगितले. तसेच अजितदादा आणि शिंदे नाराज असण्याचे काहीही कारण नसून महायुती मजबूत आणि बळकट असल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला असून अजितदादा पवार यांच्या पक्षाला केंद्रात एक मंत्रिपद देण्याचे मान्य करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा- लोणावळ्यातील अपघातांचे सत्र थांबणार? शहरात सकाळी अवजड वाहतूकीला बंदी
पुढे बोलताना आठवले म्हणाले, मला राजसभा खासदार केलेलं असल्याने आणि राज्यात प्रचाराची जबाबदारी माझ्यावर असल्याने आम्हाला लोकसभेला जगावाटपात सीट मिळली नाही. मात्र विधानसभेला आम्ही आरपीआय आठवले गटाच्या वतीनं महायुतीकडे ८ ते १० जागांची मागणी करणार आहे. महायुतीत भाजप, शिंदे यांची शिवसेना, अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी, महादेव जानकर यांची रासप, आरपीआय, विनय कोरे यांचा यांचा जनसुराज्य पक्ष असे अनेकजण एकत्र असल्याने सर्वांना योग्य प्रमाणात जागावाटप करावे लागणार आहे. त्यामुळे चर्चेला बसल्यावर मागणीपेक्षा काही जागा कमीजास्त होऊ शकतील अशी शक्यता देखील आठवले यांनी व्यक्त केली. मंगळवारी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या वतीनं लोणावळा शहरात जोरदार स्वागत करण्यात आले.
हेही वाचा- आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातील कामे पूर्ण करण्याचे महापालिका प्रशासनासमाेर आव्हान
महायुतीला लोकसभा निवडणुकीत अपयश आले हे नक्की पण त्याला कारण इंडी आघाडीमधील घटक पक्षांनी मतदारांना ब्लॅकमेल करून आणि संविधान बदलणार अशी अफवा पसरवून समाजात फूट पडण्याचा प्रयत्न केला हे आहे. आम्ही विधानसभेला याची काळजी घेणार आहे. दलित आणि अल्पसंख्याक यांचा गैरसमज दूर करून त्यांना आमच्या बाजूला वळवून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची राज्य सरकारची भूमिका असून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन राज्यात विधानसभेच्या कमीतकमी १७० ते १८० जागा निवडणूक आणण्याचा निर्धार महायुतीने केला असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.