पिंपरी-चिंचवडमध्ये रक्षणकर्ते पोलिसच असुरक्षित?
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलिसांना धमकी देणे, धक्काबुक्की करण्यापासून मारहाणीपर्यंतचे प्रकार वारंवार घडत आहेत. नाकाबंदी, वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांना मारहाण केली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसह कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करणारेच असुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी चोवीस तास पोलिस झटत असतात. नुकत्याच झालेल्या निवडणुकाही शांततेत पार पडल्या. याबाबत विविध स्तरातून पोलिसांचे कौतुकही करण्यात आले. मात्र, दरम्यानच्या काळात पोलिसांवरील हल्लेही वाढले आहेत. यापूर्वी पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की अशा घटना कानावर पडत होत्या. आता थेट मारहाणीचेही प्रकार घडू लागले आहेत. काहीजण पोलिसांवरच हात उचलू लागल्याने सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांनी कारवाईसाठी थांबवल्यास वाहनचालक त्यांना उर्मट भाषेत बोलतात, शिवीगाळ करतात, बघून घेईन अशी धमकी देतात. मागील आठवडाभरात शहरात अशा दोन घटना घडल्या. पोलिसांना मारहाण करण्यात आली. एका घटनेत तर पोलीस कर्मचाऱ्याला काही फुटांपर्यंत फरफटत नेले.
वाहतूक पोलिसांबाबत अशा प्रकारच्या घटना घडण्याचे प्रमाण अधिक आहे. बेशिस्त वाहनचालक आढळल्यास त्याला कारवाईसाठी थांबविल्यास हुज्जत होऊन असे प्रकार घडतात. दरम्यान, पोलिस कर्तव्यावर असताना त्यांचे कर्तव्य करीत असतात. मात्र, वाहतूक नियमांचे पालन न करता केवळ वाहन दामटायचे हे काहीजणांच्या डोक्यात असते. बिनधास्तपणे कशाही प्रकारे वाहन चालवायचे, कोणीही काहीही म्हणायचे नाही, अशी त्यांची मानसिकता असते. आपल्या चुकीमुळे इतरांना धोका निर्माण होईल, याचे कसलेही भान त्यांना नसते. अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिस गेले असता ही बाबदेखील अशा वाहनचालकांना सहन होत नाही. पोलिसांशी वाद घालून शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते.