
या महाराष्ट्राला हे कसलं ग्रहण लागलंय? लहान बालकांची निरागसता, त्यांच्या चेहऱ्यावरचे निर्व्याज प्रेम, ते पाहून मनात उमटणारी मातृत्व पितृत्वाची वात्सल्यपूर्ण भावना, आपली सामाजिक प्रतिष्ठा, किमान लोकलज्जा… या सगळ्या भावभावनांनी केवळ वासनेच्या विचाराने पराभूत केले? लैंगिक आकर्षण भावना इतकी मोठी झाली की आपल्या संवेदना मेल्या? सेक्स अपील इतके मोठे झाले आहे की माणसाचा माणुसकीवरील विश्वास उडावा आणि संवेदनशील मने पिळवटून जावे ? असे या घटनांमधून वाटते ….
सर्वाधिक सामाजिक सुरक्षेचा दावा करणाऱ्या महाराष्ट्रात लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या घडणाऱ्या घटना मन विषण्ण करणाऱ्या आहेत. बदलापूरच्या घटनेने थरकाप उडवला तर त्या पाठोपाठ कल्याणच्या झालेल्या घटनेने महाराष्ट्राचे मन अक्षरशः गोठवून टाकलं. लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करायचे आणि निर्दयीपणे त्यांची हत्या करण्याची ही विकृती महाराष्ट्रात इतकी कशी रुजली हे लक्षात येईना. यामुळे नामांकित विख्यात प्रख्यात शिक्षण संस्था त्यांचे संचालक आणि त्यांचे राजकीय लागेबांधे हे तर त्यांचे बळ नसेल ना ?
बदलापूरची सुरुवात
बदलापूरच्या घटनेने वर्षाच्या अखेरीला विकृतीचा हा नवा प्रवास सुरू झाला तो आज राजगुरुनगर पर्यंत सुरूच आहे. सध्या सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या मंडळींच्या संबंधित असलेली बदलापूरची संस्था ही अशा कारणामुळे समोर येईल असे कधीही वाटले नव्हते. अर्थात या शाळेच्या संबंधित असणारे शब्द प्रतिष्ठित मंडळी या प्रकारांना प्रोत्साहन देत नाहीत हे खरे असले तरी अशाप्रकारचे अत्याचार शाळकरी मुलांमध्ये होतात ही नामुष्की आणणारी गोष्ट आहे.
मिलेनियम स्कूल : मिनी बदलापूर
बदलापूर येथे जी घटना घडली त्याचीच मिनी आवृत्ती पुण्याच्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या मिलेनियम स्कूलमध्ये घडली. दहा आणि अकरा वर्षाच्या बालकांवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे समुपदेशकाकडून समोर आल्यानंतर आरोपी मंगेश…. त्याला अटक झाली परंतु हे प्रकार तब्बल दोन ते तीन वर्षापासून सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर संस्थाचालक अन्वित पाठक यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. तथापि केवळ जनक्षोभ थांबवण्यासाठी संस्थाचालकांची ही अटक असून त्याला अत्यंत किरकोळ कलम लावले आहेत. जेणेकरून त्याला तातडीने जामीन मिळावा असा आरोप आता त्या चिमुरड्यांच्या पालकांचे वकीलपत्र घेणाऱ्या वकिलांचे म्हणणे आहे.
ही शाळा भाजपाच्या एका नेत्याच्या संबंधित असल्याचा आरोप काँग्रेसने केला. पण यावर एकही भाजपाच्या नेत्याने दोन उघडले नाही. केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्री आणि खासदार असलेल्या कोथरूडच्या मतदारसंघात हा प्रकार घडला तरी देखील सर्व नेत्यांचे मौन हे अनाकलनीय आहे.
आरोपीवरील शिक्षा होण्यासाठी समाज पेटून उठावा असे अपेक्षित असताना उलटे शाळेचे बदनामी होऊ नये म्हणून एक मोठा पालक वर्ग आंदोलनाच्या पावित्र्याला माध्यमांसह अनेकांवर त्यांनी अत्यंत घणाघाती आरोप केले. शाळेच्या व्यावसायिकरणार परिणम होऊ नये म्हणून सभ्य – प्रतिष्ठित पालकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या करिअर बद्दलची भीती दाखवत हा सगळा एक प्लॅनड इव्हेंट होता की खरोखरच त्या शाळेच्या संस्थाचालकाची यात काही चूक नाही आणि त्यांची अकारण बदनामी होत आहे, याबाबत मत मतांतरे आहेत. परंतु सातत्याने दोन-तीन वर्षापासून घडणारे हे प्रकार पाहता संस्थाचालकांची यात काहीच चूक नाही असे मनाने धाडशीपणाची होईल. शेवटी अंतिम जबाबदारी ही प्रशासनाच्या आणि व्यवस्थापनाची असतेच.
सामान्य शिक्षकाला महागडा वकील ?
इतके होऊनही आरोपी असलेल्या मंगेश साळवे या एका अत्यंत सामान्य शिक्षकाच्यासाठी सुचित मेहता यासारख्या नामांकित आणि महागड्या वकील आणि त्याचे वकीलपत्र घेणे हे कसे ? हा प्रश्न देखील सर्वसामान्य पालकांना आणि विशेषतः शोषणाच्या बळी पडलेल्या पालकांना आणि त्यांच्या समर्थकांना पडला आहे. म्हणजे एवढे होऊनही त्या शिक्षकाला वाचविण्यासाठी संस्थेने आपले बळ उभा केले काय ? याची शंका येते.
दहा दिवसांपूर्वी समोर आलेल्या या प्रकारानंतर मिलेनियम मधीलच पुन्हा आठ आणि नऊ वर्षाच्या दोन मुलांनी देखील अशाच प्रकारे आपल्यावर अत्याचार झाल्याचे म्हणत शोषणाचे आणखी प्रकार पुढे आणले आहेत
अत्याचारात महिलेची ही साथ
कल्याणमधील घटना तर विवाह संबंध आणि त्याबद्दल असलेली एक प्रकारची सुसंस्कृतिकता यालाच छेद देणारे आहे. त्यातील आरोपीने दोन पत्नी ना सोडचिट्टी दिल्यानंतर तिसरी पत्नी केली. मी तरीही बाहेर लहान मुलीवर वासनांध विकृतीने घाला घातला.
या मुलीला संपवून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिसऱ्या पत्नीने त्याला साथसंगत केली. रक्ताचे थारोळे पसरलेले घर पुसून घेतले मृतदेह पोत्यात भरला आणि दोघांनी मिळून तो रिक्षातून बाहेर निघून फेकला. इतकेच नव्हे तर या प्रकारानंतर नवऱ्याला सुरक्षित ठेवण्यासाठी तिने चक्क आपल्या माहेरचा आधार घेतला आणि शेगाव सारख्या ठिकाणी तिचा नवरा सासरवाडीच्या घरात जाऊन जपून बसला. नेमके आपण कुठे चालले आहोत अशा कुठल्या विकृतीने महाराष्ट्राला पछाडले आहे. सेक्स लैंगिक आकर्षण या भावना इतक्या मोठ्या झाल्या आहेत की त्याच्यापुढे सामाजिक प्रतिष्ठा संवेदनशील मन लहान चिमूरड्यांबद्दलची सहानुभूती त्यांचे निरागस प्रेम या सगळ्या भावना बोथट झाल्या ?
या सगळ्याचा कळस काल राजगुरुनगरमध्ये पाहायला मिळाला दोन मुलींना चक्क हॉटेलमधल्या एका बॅरलमध्ये बुडवून तुंबून ठेवल्याचे समोर आले. आठ ते नऊ वर्षाच्या मुलींवर अत्याचार झाल्याची दाट शक्यता आहे. मृता अवस्थेत सापडलेल्या दोन मुलींचे मृतदेह अक्षरशा घडी घालून ठेवल्यासारखे बॅरलमध्ये कोंबले होते . ते समोर आल्यानंतर तर अंगाचा थरकाप उडाला.
गृहमंत्र्यांकडून अपेक्षा
राजकीय नेते किंवा त्या नेत्यांचे आप्तसकीय किंवा कार्यकर्ते यांच्या जवळून संबंध आहे हे पाहता सर्वच राजकारणाबद्दल कमालीची चीड व्यक्त होत आहे. विशेषतः ज्या अपेक्षेने या महाराष्ट्राचे लोकनेते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा पुढे येत आहे त्या प्रतिमेलाही कुठेतरी डाग लागत असल्याची यातून दिसून येते. महाराष्ट्राला या गुन्हेगारीपासून आणि या विकृतीपासून वाचवण्यासाठी कठोर शिक्षा करत एक प्रकारची कायद्याची दहशत बसावी असा पवित्र आता फडणवीस यांना घ्यावा लागेल भले त्यामध्ये काही स्व पक्षाचे अथवा विचारधारेचे लोकसंस्था सहभागी असतील तरीही…. !
– (एडिटर चॉईस )
अनिरुद्ध बडवे,
मुख्य संपादक