महाराष्ट्ररणधुमाळी

टाळ, चिपळ्या नि तुणतुणे

अजित पवार यांनी आमच्याकडे आलेल्यांचा पराभव झाला हे कळत नकळत मान्य केले. तर सगळ्यांना न्याय्य पद्धतीने निधी दिल्याचा आवाज त्यांच्या तुणतुण्यातून आला. अखेरीस आज निवडणूक घेतली तर आमच्या शंभर जागा येतील हे संजय राऊत रामप्रहरी म्हणाले असले तरी राज्यसभेचा एक सदस्य हातात मते असताना निवडून आणता आला नाही, हे त्यांच्या पक्षाचे भयाण वास्तव त्यांना लक्षात राहिले नाही. सबब टाळ, चिपळ्या आणि तुणतुण्याचा आवाज जोरात आहे.

विश्वासदर्शक ठराव मंजूर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तिप्रदर्शन करीत शिंदे सरकारची भूमिका अधोरेखित केली. ठामपणे आणि निर्धाराने वाटचाल केली जाईल, सोबत याल तर साथ देऊ, आडवे आलात तर आडवे करू, असा स्पष्ट कृतीशील इशारा त्यांनी दिला आहे. हा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला असला तरी त्यांचा बोलवता धनी त्यांच्या शेजारी बसलेला होता हे न समजण्याइतकी राज्यातली जनता भोळीभाबडी नाही.

अर्थात यालाच राजकारण म्हणतात आणि ते सकारात्मक, विधायक आणि रचनात्मक मार्गाने होत असेल तर जनता त्याचे स्वागत केल्याशिवाय राहाणार नाही हे नक्की. अधिवेशन सत्राच्या कालावधीचे एकूण तीन भाग करता येतील. त्याकाळात घडलेल्या घटना आणि त्याचे अन्वयार्थ लावले तर त्या तीन प्रहरांच्या वेळेला टाळ, चिपळ्या आणि तुणतुणे अशी उपमा देता येईल. मुख्यमंत्रीच नव्हे तर सभागृहात जबाबदारी नको, तोंड द्यायला लागायला नको म्हणून विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देणारे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपने त्यांच्या हिमतीची परीक्षा द्यावी, म्हणून आव्हान दिले आहे.

मध्यावधी निवडणुका घ्या आणि ताकद आजमवा, असे आव्हान त्यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची त्यांना न समजता अलगद काढून घेणार्‍या भाजपला दिले आहे. हिंदुत्व, मराठा, मर्द, कोथळा, वाघनखे यासारख्या भाषेचे कायम टाळ कुटणार्‍या उद्धव ठाकरे संघटन कौशल्यात किती दुबळे आहेत हे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावावरून सिद्ध झाले. नियोजन कसे करावे आणि त्याची अंमलबजावणी कशी असावी, दीपक केसरकर यांच्यासारखा मोहरा कधी व कसा वापरावा याची चुणूक देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे चालवत होते ती शिवसेना केवळ स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर, पुण्याईवर चालली होती आणि यापुढे जी चालेल ती त्यांच्याच नावावर हे नक्की आहे. पराभव खिलाडूपणाने स्वीकारावा लागतो हे राजकारणाचे तत्त्व आहे, तशीच राजकारणातली अपरिहार्यता आहे. मात्र त्यासाठी मनाचा मोठेपणा आणि दिलदारपणा लागतो. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे तो होता. दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांच्याकडे तो नाही.

एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करणार नाही, असे सांगण्यात काय हुशारी होती? हे न बोलता, अभिनंदन केले नसते तरी चालले असते, मात्र राजकारणात अगदीच सरधोपटपणा निरुपयोगी असतो याचा विचार आणि कृती न करता हिमतीचा आव आणून शिवसेनेच्या आभासी ताकदीचे जे टाळ वाजवले त्यातून साध्य होणारे फारसे काही नाही. आता किमान ते असे टाळ कुटणे थांबवतील आणि मिळालेला वेळ राजकारणाच्या हुशारीच्या अभ्यासासाठी उपयोगात आणतील, अशी अपेेक्षा करणेच शिवसैनिकांच्या हातात आहे.

दुसरा विषय होता तो राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा. त्यांच्या वयाचा, अनुभवाचा नक्कीच सगळ्या पक्षांतले नेते आदर करतात. त्यांच्याकडून मार्गदर्शनाची इच्छा व्यक्त करतात, मात्र सत्तांतराच्या गदारोळात आपल्याकडे दुर्लक्ष होईल या भीतीने त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहायला सांगितले. हे आम्ही सोमवारी ‘राष्ट्रसंचार‘ मध्ये म्हटले त्याप्रमाणे बारशाच्या दिवशी बालमृत्यूचे प्रमाण उपस्थितांना सांगण्यातला प्रकार होता. भारतीय जनता पक्ष मविआ कोसळणार हे सांगत होते. दर सहा महिन्यांनी ते सरकार कोसळण्याचा अंदाज व्यक्त करीत होते, मात्र सरकार कायम होते. मात्र सरकार पाडायच्या अगोदर त्यांनी अवाक्षर काढले नाही आणि चमत्कार घडवला.

या चमत्काराने शरद पवार यांना धक्का बसला होता. असे असताना केवळ आपले कार्यकर्ते आणि नेते फुटून जाऊ नयेत यासाठी मध्यावधीचे गाजर त्यांच्यासमोर बांधण्याचा हा प्रकार आहे. मविआमध्येच आता उमेदवारी मिळू शकते, भाजप आणि शिंदेसेनेत उमेदवार ठरले आहेत तेव्हा मध्यावधीची चिपळी वाजवली तर राष्ट्रवादीची अवस्था शिवसेनेसारखी होणार नाही असा त्यांचा अंदाज असावा. बरे कार्यकर्त्यांनी सज्ज व्हायचे म्हणजे काय, हा पण प्रश्न आहे.

पश्चिम महाराष्ट्र सोडला तर त्यांची ताकद ती किती आणि यापुढे राहील किती? यावर ते आता उत्तर देणार नाहीत. मात्र मध्यावधीच्या चिपळीवादनाला उद्धव ठाकरे यांच्या टाळवादनाची साथ त्यांनी मिळवली आहे. अजित पवार यांनी शिवसेनेचे तुणतुणे वाजवत सेनेतून फुटून बाहेर पडलेले पुन्हा निवडून येत नाहीत असा आवाज काढायला सुरुवात केली. आता पहिले फुटीर छगन भुजबळ हे शरद पवार यांच्याकडेच शरण आले होते आणि त्यांचा पराभव बाळा नांदगावकर यांनी केला होता. नारायण राणे त्यांच्या मित्र पक्षाकडे काँग्रेसकडे गेले आणि पराभूत झाले.

थोडक्यात अजित पवार यांनी आमच्याकडे आलेल्यांचा पराभव झाला हे कळत नकळत मान्य केले, तर सगळ्यांना न्याय्य पद्धतीने निधी दिल्याचा आवाज त्यांच्या तुणतुण्यातून आला. अखेरीस आज निवडणूक घेतली तर आमच्या शंभर जागा येतील हे संजय राऊत रामप्रहरी म्हणाले असले तरी राज्यसभेचा एक सदस्य हातात मते असताना निवडून आणता आला नाही हे त्यांच्या पक्षाचे भयाण वास्तव त्यांना लक्षात राहिले नाही. सबब टाळ, चिपळ्या आणि तुणतुण्याचा आवाज जोरात आहे. त्याला राऊतांच्या मृदंगाची बेताल साथ आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये