राम मंदिराच्या अभिषेकानंतर दिव्यांचा उत्सव साजरा, अयोध्या नगरी निघाली उजळून
अयोध्या : (Ayodhya Deepotsav) अयोध्येसह संपूर्ण देशासाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. तब्बल 500 वर्षांनंतर आज रामलल्ला अयोध्येत विराजमान आहेत. भगवान राम अयोध्येतील त्यांच्या भव्य महालात विराजमान आहेत. गर्भगृहात पूजा करून पंतप्रधान मोदींनी रामलल्लाचा अभिषेक केला. राम मंदिराच्या भव्य अभिषेकनंतर आता अयोध्येत 10 लाख दिवे लावून दीपोत्सव कार्यक्रम साजरा केला जात आहे.
भाविकांनी प्रथम हनुमानगढी मंदिरात दीपप्रज्वलन करून दीपोत्सवाला सुरुवात केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही दीपोत्सव कार्यक्रमासाठी शरयू घाटावर पोहोचले आहेत.अयोध्येत शरयू नदीच्या काठावर दिवे लावून दीपोत्सव साजरा केला जात आहे. शरयू नदीच्या किनारी राम की पायडी येथे सुमारे एक लाख दिवे प्रज्वलित केले जात आहेत.
यासोबतच अयोध्या शहरातही लाखो दिवे प्रज्वलित करण्यात येत आहेत. शरयू नदीच्या काठावर लेझर लाइट शोचेही आयोजन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर छोटी दिवाळीला दीपोत्सव साजरा केला जातो. छोटी दिवाळी व्यतिरिक्त येथे प्रथमच दीपोत्सव साजरा होत आहे.