बात कुछ बन ही ऐसी..

न संपणारी तहान ‘प्यासा’
आपल्या तंद्रीत. मस्तीत. विचारात. जगाशी ना देणे ना घेणे. मनमौला म्हणजे याचा समानार्थी शब्द गुरुदत्त. त्याचा प्यासा असाच. बेफिकीरीत. अनवट. सृजनाचा ध्यास. त्यात होणारी उलघाल. जगाचं भयावह वास्तव. प्रेमाची फुंकर. या सगळ्याचं मिश्रण प्यासा…!
प्यासा… चित्रपटाच्या नावापासून न मिटणारी तहान. कधी कधी विचार येतो, का तयार होतात असे चित्रपट? काळाच्या पुढचे… सरधोपट विचारांच्या वाटेला न जाणा… कवी अनिल यांची वाट नावाची नितांत सुंदर कविता आहे. एखादी वाट आडवळणाची असते, तर कधी एखादा वाटसरू वेल्हाळ. आपल्या तंद्रीत. मस्तीत. विचारात. जगाशी ना देणे ना घेणे. मनमौला म्हणजे याचा समानार्थी शब्द गुरुदत्त. त्याचा प्यासा असाच. बेफिकीरीत. अनवट. सृजनाचा ध्यास. त्यात होणारी उलघाल. जगाचं भयावह वास्तव. प्रेमाची फुंकर. या सगळ्याचं मिश्रण प्यासा…! म्हणतात प्यासा हा गुरुदत्तचा चित्रपट. नायक तो. दिसणारा. शरीर त्याचं, पण आत्मा साहिर लुधियानवीचा. हा चित्रपट साहिरच्या मनातल्या कथाबीजाला आकारात आणतो.
चित्रपट काव्यात्मक. कारण साहिर. साहिरच्या शब्दांना गुरुचं चित्र. या चित्रपटाची गहन गंभीरता विचारात घेता काही हलकंफुलकं असावं, असा विचार आणि त्यामुळे सर जो तेरा चकराए… सारखं एखादं गाणं. पण आज जे गाणं आपण घेतोय ते जाने क्या तुने कही… जाने क्या मैने सुनी… बात कुछ बन ही ऐसी…जाने क्या तुने कही… अतिशय गोड गाणं. वहिदा आणि गुरुचा अभिनय न बोलावं असंच! साहिरनं खूप सुंदर लडिवाळ पद्धतीनं हे लिहिलंय. गाण्याच्या सुरुवातीला वहिदा गाणं गुणगुणते आणि त्याला लागून वहिदा गाण्याला सुरुवात करते. काही म्हणावं असं काय राहील का! तू काही म्हणालास. काय? माहिती नाही आणि मी तरी ते कुठं नीट ऐकलं. पण एक झालं. जे व्हायला पाहिजे होतं ते मात्र नक्की झालं. अंगावर गोड शहारा आला. अंतर्बाह्य थरारले. अनेक स्वप्न जागी झाली. हे तू जे काही म्हणालास तेव्हा.
खरं तर झोपल्यावर स्वप्न पडतात, पण साहिरनं कमाल केली. त्याला पाहिलं आणि स्वप्न जागी झाली. कम्माल. ती होती. पण निद्रिस्त. आता जागी झाली. डोळे अर्धोन्मिलीत. पावलं अधीर. पण घोटाळलेली. एका जागी. पुढं जाण्यासाठी, नव्या जीवनाला प्रारंभ करण्यासाठी. आतुरलेली. लडिवाळ बटा आणि येणारा सुगंध. मन मोहवणारा. सुखद तरंग अवती भवती. त्यात मी विरघळते की काय? आणि अशा वेळी, परिस्थितीत मला माहीत नसलेली; माझ्याबद्दलची अनेक गुपितं मला उमगतात. काय, कशी खरंच समजत नाही. गीता दत्तनी आणि एस. डी. बर्मननी गाण्याचं सोनं केलं. बाकी काय म्हणावं!
-मधुसूदन पतकी