अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला जामीन
१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणातील आरोपीला ५० हजार रुपयांचा जामीन विशेष न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी मंजुर केला आहे.
साहिल झडपे (वय २५, रा. गोखलेनगर) असे त्याचे नाव आहे. त्याने ॲड. अजित पवार व ॲड. प्रणित नामदे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. पीडितेने त्याच्याविरुद्ध उत्तमनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्याने 2 जुलै २०२३ ते १४ एप्रिल २०२४ या कालावधीत लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले, असे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. त्याच्यावर बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार कायद्याच्या विविध कलमांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला ३० जुलै २०२४ रोजी अटक करण्यात आली होती.
आरोपीतर्फे जामीन मिळावा म्हणून ॲड अजित पवार व ॲड प्रणित नामदे यांच्या मार्फत अर्ज दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील फिर्यादीने खोटी तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलगी १७ वर्षे वयाची आहे. हा प्रकार प्रेमसंबंधातून घडलेला आहे.
आमिषातून असे कृत्य केल्यास, त्याचे काय परिणाम होऊ शकतात, हे ती समजू शकते. आरोपीकडून तिच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नव्हती. तसेच पीडिता सज्ञान झाल्यावरही आरोपीसोबत तिचे प्रेमसंबंध होते. ती आरोपीसोबत स्वत: गेली होती, असा युक्तीवाद ॲड.अजित पवार व ॲड. प्रणित नामदे यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने जामीन मंजुर केला.