जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार

बाळासाहेब शिवसेना व भाजप : लढविणार महापालिका निवडणूक
पिंपरी : पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्रित लढविणार आहे. त्याबाबतचे सूतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत झालेल्या जिल्ह्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल, असे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील विकासकामांना गती दिली जाणार आहे.
जिल्ह्यातील विकासकामांचा ‘सीएम’, ‘डीसीएम’ दरमहा आढावा घेणार असल्याचेही खासदार बारणे यांनी सांगितले.
पुणे जिल्हा, पुणे, पिंपरी-चिंचवड शहराच्या नियोजित विकासाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत वर्षा या शासकीय निवासस्थानी शिवसेना व भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस बाळासाहेबांची शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, माजी राज्यमंत्री विजय शिवतरे, बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, राहूल कुल, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत एकत्रित बैठक होणार होती. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत असल्याने मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली.
याबाबतची माहिती देताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, की पुणे जिल्हा, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका आणि विकासकामांबाबत बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.