देहू-आळंदी पालखी मार्गावर फेरीवाल्यांना बंदी
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २८ जून रोजी देहूगाव येथून निघून इनामदार वाडा देहूगाव येथे मुक्कामी असणार आहे. त्यानंतर २९ जून रोजी विठ्ठल मंदीर, आकुर्डी येथे मुक्काम व ३० जून रोजी आकुर्डी येथून निघुन हॅरिस ब्रीज, दापोडी ओलांडून पुणे आयुक्तालयाच्या हद्दीत जाणार आहे.
तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २९ जून रोजी निघून गांधीवाडा दर्शन मंडप, आळंदी येथे मुक्कामी असणार आहे. त्यानंतर ३० जून रोजी आळंदी येथून निघुन दिघी ओलांडून विश्रांतवाडी येथे पुणे शहर आयुक्तालय हदीत जाणार आहे.
हेही वाचा-पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! सिंहगड किल्ल्यावर उभारणार रोप-वे
पालखी सोहळ्यामध्ये महाराष्ट्र व परराज्यातून सात ते आठ लाख वारकरी येत असतात. पालखी प्रस्थान सोहळ्याच्या कालावधीत आळंदी शहर व देहूगाव येथे लाखो भाविक मंदिर परिसरात एकवटलेले असतात. या काळात पालखी मार्गावर फूल, फळ, खेळणी विक्रेते हातगाड्या लावून जमीनीवर बसून साहित्य विक्री करीत असतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेरीवाले बसल्यामुळे रस्ता वापरासाठी अरुंद होतो. त्यामुळे भाविक व दिंड्यांना चालण्यास व रहदारीस अडथळा निर्माण होतो. मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन चेंगराचेंगरी होण्याची दाट शक्यता असते. गर्दीचा फायदा घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपला हेतु साध्य करतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो.
हेही वाचा- ‘आरसी बुक’ मिळवणे नागरिकांसाठी ठरतेय डोकेदुखी
त्यामुळे पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. संपूर्ण पालखी मार्गावर हार, फुल, फळ, खेळणी विक्रेते, हातगाडीवाले, खाद्य पदार्थ विक्रेते व सर्व प्रकारचे फेरीवाले यांना विक्री करणे, थांबणे, विक्रीस बसणे, फिरणे अथवा इतर मार्गाने तेथे उपस्थित राहण्यास मनाई केली आहे. या आदेशाचा भंग करणार्यांवर भारतीय दंड विधान संहिता १८६० चे कलम १८८ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.