वित्तीय वर्ष 2023 दरम्यान एनपीए व्यवस्थापनामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचा अव्वल क्रमांक

नवी दिल्ली, दिनांक 28 मे : प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया मार्च 2023 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षाच्या दरम्यान आपले अनुत्पादक कर्ज खात्यांचे प्रमाण (नेट एनपीए ) ०.२५% पर्यंत मर्यादित ठेवून बँक ऑफ महाराष्ट्र ने अनुत्पादक कर्ज खात्यांच्या व्यवस्थापनामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार रुपये तीन लाख कोटी पेक्षा अधिक बँकिंग व्यवसाय असलेल्या बँकांमध्ये हे प्रमाण सर्वात कमी आहे. पुणे स्थित बँक ऑफ महाराष्ट्र नंतर खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने आपले निव्वळ अनुत्पादक कर्ज खात्यांचे प्रमाण 0.27% व कोटक महिंद्रा बँकेने तेच प्रमाण 0.37% पर्यंत मर्यादित ठेवून अनुत्पादक कर्ज खात्यांच्या व्यवस्थापनामध्ये अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील बँकांचा विचार करता बँक ऑफ महाराष्ट्र नंतर देशातली सगळ्यात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने आपल्या निव्वळ अनुत्पादक कर्ज खात्याचे प्रमाण 0.67% पर्यंत व बँक ऑफ बडोदा ने 0.89% पर्यंत आपले अनुत्पादक कर्ज खात्यांचे प्रमाण मर्यादित ठेवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे .
बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या अनुत्पादक कर्ज खात्यांसाठी भरिव तरतूद केली असून त्यांचे तरतूद समावेशन प्रमाण हे 98.28% असून त्यानंतर युको बँकेचे तरतूद समावेशनाचे प्रमाण 94.50% व इंडियन बँकेचे तरतूद समावेशन प्रमाण 93.82% आहे. दिनांक 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या वित्तीय वर्षामध्ये भांडवल पर्यंतता प्रमाणाचा विचार करता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र ने 18.14% प्रमाण ठेवून अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे . त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक 17.10% व कॅनरा बँक 16.68% भांडवल पर्याप्तता प्रमाण साध्य करून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
वित्तीय वर्ष मार्च 2023 च्या अनुसूचित व्यापारी बँकांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार कर्ज व्यवहारांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र ने 29.49% वाढ साध्य करून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर इंडियन ओव्हरसीज बँकेने आपल्या कर्ज व्यवहारात 21.28% वाढ नोंदवून दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे तर खाजगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेने 21% कर्ज वाढ साध्य करून तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने 15.38% वाढ नोंदवली आहे. ठेवींमधील वाढीचा विचार करता एचडीएफसी बँकेने 20.80% वाढ नोंदवून प्रथम क्रमांक तर फेडरल बँकेने 17 टक्के वाढ नोंदवून द्वितीय क्रमांक व कोटक महिंद्रा बँकेने 16.49% वाढ नोंदवून तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. मात्र कमी व्याजदर असलेल्या चालू खाते व बचत खात्यामध्ये ( कासा ) बँक ऑफ महाराष्ट्र ने 53.38% वाढ नोंदवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तर आयडीबीआय बँक यांनी 53.02% व कोटक महिंद्रा बँक यांनी 52.83% वाढ नोंदवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.