प्रचार खर्चात तफावत आढळल्याने बारामतीमधील उमेदवार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांना नोटीस
बारामती | बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक खर्चाच्या दुसऱ्या तपासणीत उमेदवाराने दाखविलेला आणि प्रशासनाकडील खर्चात तफावत आढळल्याने महाआघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी नोटीस बजावली आहे. याबाबत दोन दिवसांत खुलासा न दिल्यास ही तफावत मान्य असल्याचे ग्राह्य धरून हा खर्च त्यांच्या खात्यात दाखविला जाणार आहे.
बारामती मतदारसंघात निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचार खर्चाची दुसरी तपासणी करण्यात आली. त्यानुसार सुळे आणि पवार यांनी दाखविलेल्या खर्चात अनुक्रमे १.३ लाख आणि ९.१० लाख रुपये खर्चाची तफावत आढळली. ही तफावत उमेदवारांच्या प्रतिनिधीने अमान्य केली. याबाबत दोन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच याबाबत जिल्हा खर्च निरीक्षण समितीकडे दाद मागता येणार आहे.