उपमुख्यमंत्री होणं धक्काच होता : देवेंद्र फडणवीस
मुंबई | Devendra Fadnavis – राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक नव्या घडामोडी घडताना दिसत आहेत. निवडणुकांनंतर अनपेक्षितपणे झालेली महाविकास आघाडी, नंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देत शिंदे यांनी केलेले बंड आणि आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हेदेखील सत्तेत सहभागी झाल्याने राजकारण ढवळून निघाले. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी राज्यात मागील वर्षी झालेल्या सत्तांतराबाबत एका मुलाखत कार्यक्रमात हा गौप्यस्फोट केला आहे. ‘एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले पाहिजे, ही कल्पना मीच माझ्या पक्षाकडे मांडली. या नव्या सरकारमधून बाहेर राहण्याचा माझा विचार होता. मात्र मला आमच्या नेतृत्वाने उपमुख्यमंत्री व्हायला सांगितले, तो माझ्यासाठी धक्का होता,’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
सत्तांतराच्या प्रक्रियेबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि आमचे बोलणे झाले की, आता हे सरकार बदलले पाहिजे, आपल्या विचाराने सरकार चालू शकत नाही, हिंदुत्ववाद्यांचा जीव गुदमरत आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळी मी हा विषय मांडला की, शिंदेंनी मुख्यमंत्री झाले पाहिजे. मी माझ्या पक्षाकडे गेलो. पक्षाला सांगितले की, शिंदेसाहेबांना आपण मुख्यमंत्री केले पाहिजे. पक्षाला कन्व्हिन्स करण्यात मला बराच वेळ लागला. माझ्या पक्षाने लगेच ते मान्य नाही केले. मी त्यांना म्हटले, इतके मोठे पाऊल एकनाथ शिंदे उचलत आहेत, अशा परिस्थितीत त्यांचे नेतृत्त्व असले पाहिजे. त्यांच्या लोकांना कॉन्फिडन्स देईल ते. त्यानंतर पक्षनेतृत्वही तयार झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे फक्त 5 लोकांना माहीत होते. त्यामध्ये मी, स्वत: शिंदे आणि आमच्या दिल्लीतील तीन नेत्यांचा समावेश होता. आम्ही जेव्हा पत्र घेऊन राज्यपालांकडे गेलो, तेव्हा तेही आश्चर्यचकित झाले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील, ही घोषणा पत्रकार परिषदेत मी स्वत: केली.
बोलताना फडणवीस पुढे म्हणाले, मुख्यमंत्री राहिलेलो असताना त्याच्यापेक्षा खालच्या उपमुख्यमंत्रिपदावर जावे लागतेय, याचे दु:ख नव्हते मला. कारण माझ्या नेत्यांनी सांगितले तर मी चपराशीही व्हायला तयार आहे. पण आपण ज्या प्रकारचे राजकारण करतो, त्याच्यामध्ये लोक काय म्हणतील की सत्तेसाठी हा किती हपापलेला आहे? कालपर्यंत हा मुख्यमंत्री होता आणि आता सत्तेसाठी उपमुख्यमंत्री व्हायला तयार झाला आहे. मात्र नंतर माझ्या नेत्यांनी या गोष्टीला अत्यंत वरचा स्तरावर नेले, असे फडणवीस यांनी सांगितले.