भास्कर जाधवांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले, “माझी सुरक्षा काढून घेतली आणि दोन तासांत…”

मुंबई | Bhaskar Jadhav On Shinde-Fadnavis Government – ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ला झाला होता. या प्रकारानंतर चिपळूणमधील भास्कर जाधव यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधकांनी या सर्व गोष्टींसाठी एकनाथ शिंदे सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात आज (20 ऑक्टोबर) मातोश्रीबाहेर माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
“मी मुंबईत आलो तेव्हा माझ्या संरक्षणासाठी पोलिसांचा फौजफाटा होता. रात्री 11 ते 12च्या दरम्यान माझी सुरक्षाव्यवस्था काढून घेण्यात आली. प्रत्येक आमदाराला किमान एक किंवा दोन पोलिसांची तरी सुरक्षा असते. पण माझ्यासाठी एकही पोलीस ठेवला नाही. चिपळूण आणि मुंबईतील माझ्या राहत्या घरासमोरचं संरक्षण काढून घेतलं”, असं भास्कर जाधव म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “माझी सुरक्षाव्यवस्था काढून घेतल्यानंतर अवघ्या दोन तासांत माझ्या घरावर हल्ला होतो, याचा अर्थ हा हल्ला सरकारच्याच सहकार्याने गुंडांनी केलाय हे स्पष्ट झालं आहे”, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.