पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस बरसत आहे. खडकवासलासह टेमघर, वरसगाव, पानशेत या धरण साखळीतसाखळीत संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले आहे. धरणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर सोमवारी सकाळी भिडे पूल आणि शिवणे पूल पुन्हा पाण्याखाली गेले आहेत. यामुळे नदीकाठच्या वसाहतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणारा विसर्ग वाढवून सोमवारी पहाटे ४ वा. वाढवून १८ हजार ४९१ क्यूसेक करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. तसेच नदीपात्रात जवळ साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
भिडे पूल वाहतुकीस बंद
सोमवारी सकाळी भिडे पूलावरुन पाणी वाहू लागल्याने पोलिसांनी पुलाच्या दोन्ही बाजूस तात्पुरते कठडे उभे करून पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे भिडे पुलावरून जाणाऱ्या वाहनांना डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी पूलमार्गे इच्छितस्थळी जावे लागणार आहे.
दुसरीकडे, पानशेत धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे पानशेत धरणाच्या सांडव्यावरून होणारा विसर्ग वाढवून रात्री १२ वाजता ९ हजार ८२४ क्यूसेक करण्यात आला आहे. दरम्यान, जुलैच्या मध्यानंतर दमदार पाऊस बरसला आणि धरणांच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली.