एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष राहुल भोसले, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष यश साने, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर या पदाधिकाऱ्यांनी आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी महापौर आझम पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे यावेळी उपस्थित होते.
त्यांच्यासह माजी महापौर हनुमंत भोसले, वैशाली घोडेकर, शहर सरचिटणीस संजय उदावंत, माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे, विनया तापकीर, गीता मंचरकर, शुभांगी बो-हाडे, वैशाली उबाळे, अनुराधा गोफणे, माजी नगरसेवक प्रवीण भालेकर, संजय नेवाळे, वसंत बोराटे, समीर मासुळकर, संजय वाबळे, घनश्याम खेडेकर, तानाजी खाडे, शशिकीरण गवळी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती शिंदे,युवक राष्ट्रवादी भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे, विशाल आहेर, युवराज पवार, विशाल आहेर, नंदूतात्या शिंदे, शरद भालेकर यांनीही प्रवेश केला.
लोकसभा निवडणुकीतील पक्षाची निराशाजनक कामगिरी आणि राजकीय भवितव्यासाठी शहरातील पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडू लागले आहेत. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना भोसरीतून विधानसभा निवडणूक लढवायची आहे. परंतु, ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला मतदारसंघ सुटणार असे महायुतीचे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. भोसरीत भाजपचे महेश लांडगे आमदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपलाच सुटण्याचे निश्चित मानले आहे. त्यामुळे या मतदार संघातून गव्हाणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे गव्हाणे काल शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबत माजी विरोधी पक्षनेते कार्याध्यक्ष राहुल भोसले, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष यश साने आणि भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर यांनीही राजीनामे दिले होते. त्यानंतर या पदाधिकाऱ्यांनी आज तुतारी वाजविली.