ताज्या बातम्यामनोरंजन

‘बिग बाॅस मराठी 4’ला मिळाले टाॅप 5 स्पर्धक, ‘या’ स्पर्धकानं घेतली एक्झिट

मुंबई | Bigg Boss Marathi 4 – यंदा ‘बिग बाॅस मराठी’चं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4) चांगलंच गाजलं आहे. या पर्वातील प्रत्येक स्पर्धकानं प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, आता लवकरच हे पर्व प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या 8 जानेवारीला बिग बाॅस मराठीचा अंतिम सोहळा पार पडणार आहे. अशातच आता बिग बाॅसला त्यांचे टाॅप 5 (Top 5) स्पर्धक मिळाले आहेत. तर एका स्पर्धकानं घरातून एक्झिट घेतली आहे.

काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या घरातून प्रसाद जवादे हा बाहेर पडला होता. त्यानंतर बिग बॉसनं घरात मीड विक एव्हिक्शन पार पडणार असल्याचं सांगितलं. बिग बॉसने जाहीर केलेला हा ट्विस्ट पाहून घरातील सर्वच सदस्यांना धक्का बसला होता. तसंच अपूर्वा नेमळेकरला ‘तिकीट टू फिनाले’ मिळाल्यानं ती टॉप पाच स्पर्धकांमध्ये पोहोचली होती. यामुळे अक्षय केळकर, राखी सावंत, अमृता धोंगडे, आरोह वेलणकर, किरण माने हे सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत होते.

यावेळी ‘मिड विक एव्हिक्शन’ हा टास्क पार पडला. या टास्कदरम्यान अमृता धोंगडेला ती घराबाहेर जाईल असं वाटत असल्यानं ती रडत होती. पण अखेर काल झालेल्या बिग बॉसच्या भागात आरोह वेलणकरला घराबाहेर जावं लागलं. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.

दरम्यान, आता बिग बॉसच्या घराला टॉप 5 सदस्य मिळाले आहेत. यामध्ये अपूर्वा नेमळेकर, किरण माने, अक्षय केळकर, अमृता धोंगडे आणि राखी सावंत या स्पर्धकांचा समावेश आहे. त्यामुळे यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये