‘भाजपनं मतदारांना पैसे वाटले’ धंगेकरांच्या आरोपावर फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “पायाखालची वाळू निघून जाते तेव्हा…”

मुंबई | Devendra Fadnavis On Ravindra Dhangekar – कसबा पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll Election) भाजपनं (BJP) पैसे वाटल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला आहे. या विरोधात ते आज (25 फेब्रुवारी) कसबा गणपती मंदिरासमोर सप्त्नीक उपोषणाला बसले होते. मात्र, पोलिसांनी दिलेल्या कारवाईच्या आश्वासनानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. दरम्यान, धंगेकरांनी केलेल्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हा राजकीय स्टंट आहे. हे स्पष्टपणे लक्षात येत आहे की आज कुठल्याही प्रकारचा प्रचार करता येत नाही. हे माहीत असतानाही अशाप्रकारचा स्टंट करून एक नवीन प्रकारे प्रचार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जेव्हा पायाखालून वाळू निघून जाते, तेव्हा असे स्टंट केले जातात.”
“खरं सांगायचं झालं तर हे आचारसंहितेचं पूर्ण उल्लंघन आहे. पैसे वाटणे ही भाजपची संस्कृती नसून काँग्रेस, राष्ट्रवादीची आहे. आमचा मतदारही असा नाहीये की पैसे घेऊन कुठे मतदान करेल. खरं म्हणजे हे एकप्रकारे मतदारांचा अवमान करण्याचं काम आहे. हे उपोषण भाजपच्या विरोधात नसून हे मतदारांच्या विरोधात आहे. कारण, मतदारांना तुम्ही विकावू ठरवत आहात, हे अतिशय चुकीचं आहे. ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो.” असंही फडणवीस म्हणाले.