पुणे : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे, फडणवीस सरकारने महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या त्रिसदस्य प्रभाग रचना रद्द करून आता त्या जागी चार सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिंदे आणि फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला. मात्र या निर्णयावरून पुन्हा एकदा घमासान होण्याची शक्यता आहे. या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केलाय. तर दुसरीकडे भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी मात्र शिंदे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या त्रिसदस्यीय प्रभार रचना रद्द करून आता ४ सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय शिंदे आणि फडणवीसांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मात्र विरोध केला आहे.
भाजपचे जगदीश मुळीक म्हणाले, मी या निर्णयाचे स्वागत करतो. महविकास आघाडी सरकारने बेकायदेशीरपणे महापालिकेची सदस्य संख्या वाढवली होती. वास्तविक जनगणना पूर्ण झाल्यानंतर त्या प्रमाणात सदस्य संख्या वाढविणे अपेक्षित होते. परंतु महाविकास आघाडीने चुकीचा निर्णय घेतला. अनेक होतकरू राजकीय कार्यकर्त्यांची निवडणूक लढविण्याची संधी गमवावी लागली असती. आता नवीन सरकारने पुन्हा चारचा प्रभाग केला आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो. भौगोलिक सजगतेमुळे सर्वांना समान संधी मिळेल. भाजपचे महापालिकेतील संख्या बळ वाढून ते ११० च्या पुढे जाईल असा विश्वास वाटतो.
राज्य सरकारनं घेतलेला निर्णय चुकीचा आहे, असं मत राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांनी व्यक्त केले. निवडणुकांना पुन्हा सात ते आठ महिने उशीर होण्याची शक्यता आहे. पुन्हा प्रभागांची रचना करणं, पुन्हा आरक्षण काढणं, या सगळ्या प्रक्रियेला कमीत कमी ६ ते ८ महिन्याचा कालावधी लागेल. त्यामुळे नजीकच्या काळात या निवडणुका होतील असं वाटत नाही.