भाजपचं ‘मिशन राष्ट्रपती’; ‘या’ केंद्रीय मंत्र्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. तर २१ तारखेला मतमोजणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. तसंच छोट्या मोठ्या पक्षांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी चुरस सुरु झाली आहे. भाजपकडून देखील जोरदार तयारी सुरु असून याची सर्व जबाबदारी भाजपने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर सोपवली आहे.
राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडण्यासाठी भाजप एनडीएमधील मित्रपक्षांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसंच अपक्षांसोबत देखील भाजप चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसंच राष्ट्रपतींच्या निवडणूक प्रकियेमध्ये मतदान करण्यासाठी लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेचे सदस्य सहभागी होतील. त्यानंतर मतमोजणी 21 जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर भारताच्या नवीन राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २२ विरोधी पक्ष नेत्यांना एक पत्र लिहलं आहे. त्या पत्रात त्यांनी १५ जूनला दिल्लीत बैठकीसाठी बोलावले आहे. त्याचबरोबर सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळली असून सर्व विरोधी पक्ष नेत्यांनी एकत्रित आलं पाहिजे तरच लोकशाही वाचवली जाईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे.