राष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

रक्तमूल्यहि जीवितम्…!

डॉ. शंकर मुगावे

वैद्यकीय क्षेत्रात आपले अमूल्य योगदान दिलेल्या कार्ल लँडस्टायनर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी जागतिक पातळीवर रक्तदाता दिवस साजरा केला जातो. थोर शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टायनर यांचा ऑस्ट्रेलिया ह्या देशात झाला होता. सन १९३७ सगळ्यात पहिला रक्तगटाचा शोधही कार्ल लँडस्टायनर यांनीच लावला होता. यानंतरच रक्ताचे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये वर्गीकरण करण्यास सुरुवात झाली. याने लाखो लोकांचे प्राण वाचवण्यास मदत होऊ लागली. कार्ल लँडस्टायनर यांनी चिकित्सा क्षेत्रामध्ये दिलेल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना एक विशेष पदवी बहाल करण्यात आली होती. जिचे नाव फादर ऑफ ट्रान्सफ्युझन मेडिसिन असे होते. विज्ञान क्षेत्रातदेखील कार्ल लँडस्टायनर यांनी अनेक महत्त्वाची कार्ये करीत आपले अमूल्य योगदान दिले, ज्याचे परिणामस्वरूप त्यांना फिजिओलॉजी आणि मेडिसिन क्षेत्रातील अत्यंत मानाचा मानला जात असलेला नोबेल पुरस्कारदेखील बहाल करण्यात आला. मेडिकल क्षेत्रात आपले अमूल्य योगदान दिलेल्या कार्ल लँडस्टायनर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी जागतिक पातळीवर रक्तदाता दिवस सन २००४ पासून साजरा केला जातो. अशा ह्या महान शास्त्रज्ञाचा मृत्यू सन १९४३ मध्ये वयाच्या ७५ व्या वर्षी झाला होता. तेव्हापासून कार्ल लँडस्टायनर यांच्या आठवणीत दरवर्षी हा रक्तदातादिन साजरा केला जातो. जगभरातील सर्व गरजू, तसेच शरीरात रक्ताची कमतरता, तसेच अभाव असलेल्या व्यक्तींना रक्त प्राप्त व्हावे, यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. याचसोबत जनतेत रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण करणे त्यांना रक्तदानाचे फायदे आणि गरज लक्षात आणून देणे जेणेकरून जास्तीत जास्त व्यक्ती रक्तदान करतील, हादेखील रक्तदाता दिवस साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. जे व्यक्ती दरवर्षी गरजू व्यक्तींना आपले रक्त देत असतात, अशा व्यक्तींचा सन्मान करण्यासाठीदेखील हा दिवस साजरा केला जातो.

ऐच्छिक रक्तदानाबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे, शंभर टक्के रक्तदान ऐच्छिक स्वरुपात करून घेणे. या ऐच्छिक रक्तदानातून गरजू रुग्णांना सुरक्षित व चांगला रक्तपुरवठा करणे, नेहमीसाठी रक्तपेढीत पुरेसा रक्तसाठा उपलब्ध ठेवण्यासाठी ऐच्छिक रक्तदाते नियमित रक्तदाते बनले पाहिजेत. तसेच ऐच्छिक रक्तदाता हा रक्तपेढीसाठी आणि रुग्णांसाठी प्रामुख्याने देवदूत असतो. रक्तदान करणे हे स्वतःचे आरोग्य चांगले राहण्यासाठीही उपयुक्त असते, हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा ते ऐच्छिक रक्तदान करण्यास स्वतः प्रवृत होतील, यात शंका नाही.

यामध्ये काही रक्तदाते स्वतःच्या नातेवाईकांसाठी आणि मित्रांसाठी ऐच्छिकरीत्या रक्तदानासाठी प्रवृत्त होताना पाहायला मिळतात, त्यांना नियमित रक्तदाते म्हणून कायम ठेवायचे असेल तर त्यांना आपुलकीने, प्रेमाने आणि सन्मानाने वागविले पाहिजे.
मानवी रक्तदान ही एक चळवळ म्हणून उभी राहिली पाहिजे आणि ही चळवळ केवळ शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही रक्तदान चळवळीबाबत मोठ्या प्रमाणात जाणीवजागृती झाली पाहिजे ही काळाची गरज आहे. मानवी रक्त शुद्ध ठेवून वाढवण्यासाठी सर्वात मुख्य उपाय म्हणजे नियमित व्यायाम – प्राणायामाबरोबरच रक्तदान असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. रक्तदान हे एक परमकर्तव्य आणि सामाजिक बांधिलकी समजून प्रत्येकाने ऐच्छिक रक्तदान करावे. मानवी शरीरातील रक्त हा द्रवपदार्थ अतिशय महत्त्वाचा रक्त हा प्रवाह आहे. रक्त हे ६० टक्के द्रवपदार्थ आणि ४० टक्के पेशींनी बनलेले आहे. तुमच्या शरीरातील एकूण रक्तापैकी पाच सहा टक्केच रक्त आपण दान करतो. सर्वसाधारणपणे सुदृढ माणसाच्या शरीरात पाच ते सहा लिटर रक्त असते. मानवाला नियमित हालचालीसाठी तीन लिटर रक्तच लागते, तर तीन लिटर रक्त प्रत्येक सक्षम आणि सुदृढ व्यक्तीच्या शरीरात राखीव असते. यातूनच व्यक्ती रक्तदान करताना ३५० मिली. रक्तच दान करतो. रक्त हा मानवी शरीरातील परमेश्वरी घटक आहे. एकाच्या रक्तदानातून दोन ते तीन रुग्णांचा जीव वाचवू शकतो. रक्तदानाद्वारे दिलेले रक्त कोणत्याही प्रकारचा थकवा न येता आठ ते चोवीस तासांत मानवी शरीर भरून काढते. रक्तदानामुळे मानवाचे बोनमॅरो रक्तदानामुळे सक्षम होऊन नवीन रक्तनिर्मितीस चालना मिळते आणि यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. नियमित रक्तदान केल्याने रक्त शुद्धी होण्यास मदत होते. एकंदरीत रक्त गोठण्याचे विकार व आजार सहजासहजी होत नाहीत किंवा या आजारापासून धोका टाळता येऊ शकतो, तो केवळ आणि केवळ रक्तदान केल्याने असे वैद्यकीय संशोधनातून हे चित्र समोर आले आहे.
प्रत्येक सुदृढ व्यक्तीला वर्षातून चार वेळेस म्हणजेच तीन महिन्याला एकदा रक्तदान करता येते. यासाठी तुमचे वय १८ ते ६५ वर्षांपर्यंत आणि वजन ४५ ते ५० किलोच्या वर आणि रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ ग्रामच्यावर असावे लागते. रक्तदानापूर्वी रक्तदात्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते आणि नंतरच योग्यता पाहून रक्त घेतले जाते. रक्तदान केल्याचे आत्मिक समाधान मिळेल. तसेच रक्तदात्याला निरोगी आणि सुदृढ राहण्यास मदतच होईल.

रक्तदान चळवळीत देशात महाराष्ट्र सर्वाधिक प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्र राज्य रक्तसंक्रमण परिषद, मुंबई याची स्थापना २२ जानेवारी १९९७ रोजी झाली. यानंतरच खर्‍या अर्थाने राज्यात रक्तक्रांतीला सुरुवात झाली. गेल्या पंचवीस वर्षांत योजनाबद्ध प्रयत्न करून रक्तदानाबाबत महाराष्ट्र राज्याने रक्तक्रांती घडवली आहे. केंद्रीय धोरणानुसार शंभर टक्के ऐच्छिक रक्तदान ही संकल्पना निश्चित करण्यात आली होती. भारतात आजमितीस एकूण ३०२३ नोंदणीकृत रक्तपेढ्या अंतर्गत ११.४५ मिलियन रक्त पिशव्या गोळा झाले होते. यामध्ये ८५ टक्के रक्तसंकलन ऐच्छिक रक्तदान स्वरुपात झाले होते, तर महाराष्ट्रात ३५ जिल्ह्यांतून ३५० रक्तपेढ्या अंतर्गत सन २०१९ मध्ये १७ लाख २३ हजार ३६३ एवढे युनिट्स रक्त संकलित झाले, यामध्ये ९७.५४ टक्के रक्तसंकलन ऐच्छिक स्वरुपात होते, तर सन २०२० मध्ये कोरोना महामारीच्या संकटामुळे १५ लाख ४५ हजार ८२६, तर सन २०२१ मध्ये १६ लाख ७३ हजार ३७३ एवढे रक्तसंकलन झाले आहे. यामध्ये ९९.०७ टक्के रक्तसंकलन ऐच्छिक स्वरुपात झाले आहे. कोरोना संसर्गाचा रक्तसंकलनाला फटका सन २०२० मध्ये बसल्याने १ लाख ७७ हजार ५३७ एवढे रक्तसंकलन घटले होते. गेल्या दीड वर्षात म्हणजे कोरोना कालावधीत रक्तसंकलनात पुणे महसूल विभागाने आघाडी घेतली असल्याचे दिसून येते. तरीही नवीन रक्तदात्यांसोबतच नियमित रक्तदाते वाढविणे ही काळाची गरज आहे. यासाठी जागरूक नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये