पुण्यात बॉम्बस्फोटाचा कट ?
![पुण्यात बॉम्बस्फोटाचा कट ? pune 1 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/07/pune-1-1-780x470.jpg)
एटीएसच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
पुणे | Pune News – गेल्या दीड वर्षापासून पुण्यात (Pune) वास्तव्यास असलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी दोघांना सहा दिवसापूर्वी कोथरूड पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान अटक केली होती. यातील एक साथीदार फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, आता या तिघा दहशतवाद्यांकडून शहरातील संवेदनशील ठिकाणी असलेल्या काही पार्क केलेल्या दुचाक्यांमध्ये स्फोटके ठेवून मोठा बॉम्बस्फोट घडविण्याचा कट होता, असे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) तपासात आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेकडून मोठी खबरदारी घेण्यात येत असून, संपूर्ण पोलीस दलास सतर्क राहण्याचे आदेश पोलीस आयुक्तांकडून देण्यात आले आहेत.
पुणे पोलिसांनी १८ जुलै रोजी पहाटे कोथरूड परिसरात नाकाबंदीदरम्यान दोन फरारी दहशतवाद्यांना अटक केली होती. महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान (वय २३) आणि महम्मद युनूस महम्मद याकू साकी (वय २४, दोघे रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा, मूळ रा. रतलाम, मध्य प्रदेश) या दोघांना न्यायालयाने २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. पसार झालेल्या महम्मद शाहनवाझ शफीउर रहमान आलम (वय ३१, मूळ रा. पेलावल, ता. हजारीबाग, झारखंड) याचा पोलीस शोध घेत आहेत. या दहशतवाद्यांचे ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेच्या ‘अह उल सफा’शी संबंध
( कनेक्शन ) असल्याची माहिती सुद्धा एटीएसच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.
तिघेही दहशतवादी कोंढव्यातील मीठानगर परिसरात दीड वर्षांपासून वास्तव्यास होते. इम्रान खान आणि युनूस साकी हे दोघेही ग्राफिक्स डिझायनर आहेत. एनआयएच्या अधिकाऱ्यांकडूनही आरोपींची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. हे तिघे दहशतवादी कोंढव्यातील मीठा नगरमध्ये भाडेतत्त्वावर घेतलेल्या सदनिकेत राहत होते. संबंधित घरमालकाने याबाबत कोणताही भाडेकरार केला नसल्याचेही समोर आले आहे.
जयपूरमध्येही बॉम्बस्फोटाचा कट
सध्या अटकेत असलेले दहशतवादी खान आणि साकी शहरातील संवेदनशील ठिकाणांची पाहणी करण्याच्या तयारीत असल्याचा संशय एनआयएला आहे. त्या दृष्टीने त्यांची चौकशी करण्यात येत आहे. घरझडतीदरम्यान त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या गोळ्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. पोलिसांनी एक काडतूसही जप्त केले आहे. मात्र पिस्तूल अद्याप सापडले नाही. साकी आणि खान हे ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेची उपसंघटना सुफाशी संबंधित असून, ते जयपूर येथे मोठा बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत होते.
साहित्य तपासणीसाठी प्रयोगशाळेत
कोंढव्यात वास्तव्यास असलेल्या कालावधीत त्यांच्या संपर्कात आणखी कोण कोण होते ? त्यांचा आणखी कोणासोबत संबंध आहे का ? याबाबतचा अधिक तपास करण्यात येत आहे. आरोपींकडून जिवंत काडतूस, चार मोबाइल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आली होती. हे जप्त करण्यात आलेले साहित्य न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश
राजस्थानमधील जयपूर शहरात बॉम्बस्फोट घडविण्याचा कट आखणारा मास्टरमाइंड इम्रान खान याच्यासह दोन दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केलेल्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपविण्यात आला. दरम्यान, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी येत्या १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलास सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस आयुक्तांनी बोलावली बैठक
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शनिवारी सायंकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर शहरात अनुचित घटना टाळण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याबाबत, तसेच नाकाबंदी आणि कोंम्बिग ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिले आहेत.