सीमावाद चिघळला! ‘कन्नड वेदिके’ संघटनेकडून बेळगावात महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड!

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न वरचेवर चिघळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने घेतली आहे. त्यांचा विरोध पाहता महाराष्ट्रातील मंत्र्यांनी त्यांचा बेळगाव दौरा रद्द केला आहे. मात्र, कन्नड रक्षण वेदिके संघटनेचे नेते नारायण गौडा बेळगाव दौऱ्यावर आहेत. संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून बेळगावमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं असून, त्याला हिंसक वळण लागलं आहे. हिरबागेवाडी येथील टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या सहा वाहनांवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे.

दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील 18 गावं कर्नाटकात जाण्यास उत्सुक आहेत. याबाबत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावाकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. तर जत तालुक्यातल्या 40 गावांचा वाद ताजा असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी सोलापूर आणि अक्कलकोटवरही दावा केला आहे.
महाराष्ट्रातील कोणताही मंत्री बेळगावात येऊ नये यासाठी गेल्या चार ते पाच दिवसांपासून कन्नड संघटनांनी संपूर्ण बेळगाव शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच सोमवारी जिल्हाधिकाऱ्यानी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगाव जिल्ह्यात बंदीचा आदेश बजावल्यानंतर देखील कन्नड संघटना जाणीवपूर्वक मराठी भाषिकांना लक्ष करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

हिरे बागेवाडी येथे महाराष्ट्र राज्यातील ट्रक व इतर वाहनांवर चढून धिंगाणा घालण्यात आला. तसेच लाल पिवळे झेंडे फडकून महाराष्ट्र सरकार आणि मराठी भाषिकांविरोधात गरळ ओकण्याचे काम कन्नड संघटनानी केले आहे. या प्रकारामुळे मराठी भाषिकातून एकच संताप व्यक्त केला जात आहे तसेच कन्नड संघटनाना वेळीच रोखावे अन्यथा मराठी भाषिक जशास तसे उत्तर देतील असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.