प्रेयसीला घरात डांबून लैंगिक छळ अन्…, पुण्यातील धक्कादायक घटना!
पुणे | शहरात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून तसेच लग्नाचे आमिष दाखवून महिला व तरुणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणीच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशातच कोंढवा भागात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रेयसीला घरात डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुंढवा येथे राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यावरून कोंढवा येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार मे २०२३ ते सहा डिसेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे. आरोपीची पीडित तरुणीशी नोव्हेंबर २०२२मध्ये एका मैत्रिणीमुळे ओळख झाली होती. त्यानंतर ओळख वाढत गेली आणि आरोपीने मे २०२३मध्ये पीडितेला लग्नाची मागणी घातली. तिने देखील त्यास होकार दिला. त्यानंतर ते दोघे एकत्र फिरत होते. पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना दोघांच्या मैत्रीबद्दल माहिती होती. त्यानंतर आरोपी तरुणाने तक्रारदार तरुणीसोबत वारंवार जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवला. तसेच तिचा मोबाइल आणि लॅपटॉप काढून घेतला.
तिला मानसिक त्रास देऊन, ‘तू पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर घरामधील कुत्र्यांना गॅलरीतून फेकून देईन,’ अशी धमकी दिली आणि घराबाहेर जाण्यासाठी अटकाव केला. त्यानंतर तरुणीच्या डोक्यात कठीण वस्तूने मारून तिला जखमी केले. ‘आरोपीने तरुणीला त्याच्या कोंढव्यातील घरात चार ते पाच दिवस जबरदस्तीने डांबून ठेवले; तसेच अमानुष मारहाण केली. आरोपीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आहेत,’ असे तक्रारीत नमूद आहे. उपनिरीक्षक बालाजी डिगोळे तपास करीत आहेत.