मेंदू आणि जिज्ञासा

अष्टावधानी बौद्धिक विकासासाठी, तल्लख बुद्धीनिर्मितीसाठी पोषक वातावरण किंवा अनुकूल मानसिकता महत्वाची असते. अष्टावधानी किंवा तल्लख बुद्धीच्या निर्मितीसाठी पोषक वातावरणाची पहिली अवस्था गरज, दुसरी इच्छाशक्ती या दोन मानसिकतेवर आपण मागील लेखात चर्चा केलेली आहे. आज तिसरी मानसिक अवस्था म्हणजे ‘जिज्ञासा’ यावर आपण चर्चा करूया.

ज्याप्रमाणे एका रोपट्याला वेळेवर खतपाणी दिले की, त्या रोपट्याला नवीन अंकुर जास्त फुटतात, त्याचे फांद्यांमध्ये लवकर रुपांतर होते. फांद्यांचे उपफांद्यांमध्ये होऊन त्याचे वृक्षामध्ये रुपांतर होते. तसेच आपल्यामध्ये, आपल्या मुलांमध्ये जिज्ञासा निर्माण झाली की, आपल्या मेंदूमधील न्यूरॉन्स पेशीलासुद्धा अनेक नवीन फांद्या फुटतात. या नवीन फुटलेल्या फांद्यांच्या इतर न्यूरॉन्ससोबत जोडण्या झाल्या, की त्यातून शिक्षण किंवा मानसिक क्रिया होऊन बुद्धिमत्ता वाढत असते.

मेंदूला, बुद्धीला विकसित होण्यासाठी सर्वांमध्येच जिज्ञासा ही मोठ्या प्रमाणात निसर्गत: असते. परंतु दैनंदिन जीवनामध्ये, दैनंदिन व्यवहारामध्ये, शिक्षणामध्ये जिज्ञासेमधून किती प्रमाणात अनुभव घेतले जातात, त्यावर आपली बुद्धिमत्ता अवलंबून असते.

ररोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शेकडो अनुभव आपल्याला येत असतात. या विविध अनुभवांत जितकी आपली जिज्ञासा जास्त, तितके मेंदूमधील न्यूरॉन्स उजळून निघतात. न्यूरॉन्स ॲक्टिव्ह झाले, की न्यूरॉन्सच्या जोडण्या जास्त होतात. याच न्यूरॉन्सच्या जोडण्यांमधून उच्च, तल्लख बुद्धिमत्ता आकार घेत असते. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीला पाहण्याचा दृष्टिकोन जिज्ञासेमधून असला पाहिजे. जगात जे जे शोध लागले ते सर्व त्यांच्यामध्ये निर्माण झालेल्या जिज्ञासेमधूनच.

त्यामुळे सर्व पालक आणि शिक्षकांनी आपल्या मुलांमध्ये जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे, याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. शिक्षणात, अभ्यासात जिज्ञासा अतिशय महत्त्वाची आहे. अभ्यासात जिज्ञासा असली, की मेंदूमधील न्यूरॉन्स उजळून निघतात. न्यूरॉन्सच्या जोडण्या जास्त होतात. याच न्यूरॉन्सच्या जोडण्यांमधून एकाग्रता, स्मृती, तल्लख बुद्धिमत्ता, मुलांची समज, मुलांचा दृष्टिकोन आकार घेत असतो.

मग येथे महत्त्वाचा प्रश्न पडतो, तो म्हणजे आपण आपल्या मुलांची जिज्ञासा जपतो का? आपली मुलं अभ्यासात, शिक्षण घेत असताना त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण होते का? जिज्ञासेमधून शिक्षण घेण्याचा दृष्टिकोन त्यांच्यात निर्माण झालेला आहे का? माझा तर अनुभव याच्या उलटच आहे.

जेव्हा आम्ही कौन्सिलिंगमध्ये अनेक पालकांसोबत चर्चा करतो तेव्हा पालक मुलांच्या जिज्ञासेला दाबून टाकण्यासारख्या अनेक कृती करीत असतात. हे आमच्या अनेक वेळा लक्षात आलेले आहे. उदा – मुलं अनेक प्रश्न विचारत असतात, परंतु पालक मात्र अनेक प्रश्नांची उत्तरे टाळतात. मुलांच्या अनेक कृती सुरू असतात, परंतु मुलांच्या या कृती पालकांना त्रासदायक असतात.

त्यामुळे या कृती थांबविण्याचे काम पालक करतात. असे होत असेल, तर मुलांची तल्लख बुद्धिमत्ता कशी विकसित होईल? अधिक माहितीकरिता ‘सुजाण पालकत्व’ या यू ट्यूब चॅनेलला भेट द्यावी. या चॅनेलवर ‘बौद्धिक विकासाच्या पायऱ्या’ या प्ले लिस्टमधील इच्छाशक्ती हा व्हिडीओ पाहावा. (क्रमश:)

Prakash Harale: