अवघ्या सव्वा तासात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून आतील सात लाख ८६ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घअना शुक्रवारी (दि. २०) दुपारी साडेअकरा ते पावणे एक वाजताच्या दरम्यान खेड तालुक्यातील कुरूळी गावात घडली.
अरविंद प्रकाश कसाळे (वय ४२, रा. मु.पो. कुरूळी, ता. खेड, जि. पुणे) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कसाळे यांचे घर शुक्रवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी पावणे एक वाजताच्या दरम्यान कुलूप लावून बंद होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील लाकडी कपाट उचकटून आतील २६.२ तोळे वजनाचे सात लाख ८६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.