पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरातील बीआरटी मार्गाला ग्रहण; चार मार्गांवरील बससेवा बंद

पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटी मार्गाला या ना त्या कारणाने ग्रहण लागले असल्याचे दिसत आहे. यामुळे बीआरटी मार्ग बंद करावा लागण्याची वेळ आली आहे. बीआरटीसाठी सर्वात जास्त उपयोग जुना पुणे-मुंबई मार्गावरील बीआरटीचा होत असतो. त्यामुळे शहरातील ४ बीआरटी मार्ग हे केवळ नावापुरतेच उरलेले आहेत, असे चित्र आता शहरात दिसत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ या दोन्हीमध्ये समन्वय नसल्याने त्याचा फटका या बीआरटी मार्गांना होत आहे.

प्रवासी वर्गाला मोठा फटका

पीएमपीएमएलच्या बसमधून जलद प्रवास व्हावा यासाठी शहरातील चार मार्गांवर बीआरटी धावत आहे. सांगवी फाटा ते मुकाई चौक दरम्यानचा किवळे ते मुकाई चौक हा बीआरटी खोदकामामुळे बंद आहे. त्यामुळे बसेस बाहेरील मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. या सगळ्याचा परिणाम या स्वतंत्र मार्गावर होत आहे. या मार्गावर किवळे चौकात मोठ्या प्रमावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्तावरील या चिंचवड स्टेशन येथला रस्ता अर्धवट स्वरुपात आहे. तसेच भक्ती-शक्ती ते मुकाई चौक हा मार्गदे जागा ताब्यात न आल्याने तसेच बस स्थानकाचे काम पूर्ण झाले नसल्याने मोठा अडथळा निर्माण झाला आहे. शहरात काही मार्ग चांगल्या पद्धतीने सुरू आहेत तर, काही मार्ग सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. त्याचा मोठा फटका प्रवासी वर्गाला बसताना दिसत आहे.

बीआरटी मार्ग कधी सुरळीत होणार ?

 दापोडी ते निगडी बीआरटी मार्गात अडथळे आले आहेत. वारंवार होणारे अपघात आणि मार्गावर पडणाऱ्या झाडांच्या फांद्या यामुळे हा मार्ग सतत बंद पडत आहे. शहरात ज्यावेळी मेट्रोची कामे सुरू होईल त्यावेळी अनेक अडचणींचा सामाना करावा लागणार आहे. ही कामे झाल्यानंतर यामधील त्रुटी दूर होतील असे बोलले जात आहे. मात्र, असे असले तरी बीआरटी मार्ग कधी सुरळीत होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याबाबत बोलताना पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे म्हणाले की या मार्गावरील बीआरटी बंद करण्याबाबत कोणताही निर्णय अथवा पत्रव्यवहार झालेला नाही. प्रवाशांसाठी विनाअडथळा बस सुरू आहेत. अजून तरी कोणतीही अडचण या मार्गाला नाही. तर शहरातील कोणताही बीआरटी मार्ग बंद केला जाणार नाही. भविष्यात मेट्रोची कामे सुरू असताना टप्प्या-टप्प्याने बंद केला जाऊ शकतो. मात्र त्यानंतर तो पुन्हा सुरू केला जाईल. प्रवाशांच्या सेवेसाठी बीआरटी मार्ग विनाअडथळा सुरू ठेवण्याचा मानस आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाहतूक व नियोजन विभागाचे कार्यकारी अभियंता बापू गायकवाड यांनी दिली.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये