ताज्या बातम्यारणधुमाळी

‘…पण या सुपाऱ्या राज्यात चालणार नाहीत’- संजय राऊत

मुंबई : आज मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहसचिव यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय आणि एकूण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे.

“महाराष्ट्राविरोधात षडयंत्र सुरू आहे. राज्याबाहेरील काही लोकांना इथे आणून दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्वत:ची ताकद नाही, तर बाहेरून लोक आणून महाराष्ट्रात अस्थिरता आणि बेकायदेशीर कृत्य करण्याचे प्रय़त्न सुरू आहेत. अल्टिमेटमचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही, इथे केवळ ठाकरे सरकारचा शब्द चालेल.” असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आज औरंगाबादमधील मनसेच्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, “अशाप्रकारचे गुन्हे हे नेहमी दाखल होत असतात, नवीन काही नाही. आमच्यावर देखील झाले आहेत, आमच्या लिखाणावर झाले, आमच्या वक्तव्यांवर झाले आहेत. जर कोणी कायद्याचं उल्लंघन करत असेल, ती व्यक्ती कितीही मोठी असू द्या त्यावर गुन्हे दाखल केले जातात. चिथावणीखोर भडकाऊ भाषणं देणं आता सामानावरती त्या कलमाखाली अनेक गुन्हे आहेत. आमच्या अग्रलेखावर त्यात वेगळं असं काय आहे?”

पुढे राऊत म्हणाले, “सरकारची भूमिका सरकार ठरवेल. पण या क्षणी राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे. गृहमंत्री, गृहसचिव, मुख्यमंत्री यांच्या बैठकीत मी देखील होतो. राज्यात शांतता, सुव्यवस्था आहे.”

तर, “नक्कीच अशी माहिती आहे की राज्याच्या बाहेरून काही गुंड प्रवृत्तीचे लोक मुंबईत आणून गडबड करायची. ज्यांची ताकद नाही, अशा लोकानी… शेवटी हे सुपारीचं राजकारण असतं. पण या सुपऱ्या या राज्यात चालणार नाही. मुंबई आणि राज्याचे पोलीस सक्षम आहे.गृह विभाग सक्षम आहे, मुख्यमंत्र्यांचं देखील सर्व घडामोडींवर लक्ष आहे. तेव्हा कोणी फार चिंता करण्याची गरज नाही. अल्टिमेटमवर राज्य चालत नाही. यंत्रणा सक्षम आहेत, नेतृत्व सक्षम आहे, सरकार सक्षम आहे. कुणी जर हे राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने करत असेल, तर मला असं वाटतं की ते सगळ्यात मोठी चूक करतील आणि स्वत:च उघडे पडतील.” असंही संजय राऊत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये