निवडणूक खर्चाचा उमेदवारांचा अंतिम तपशील जाहीर
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ नुकतीच पार पडली. या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा उमेदवारांचा अंतिम तपशील आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना सर्वाधिक निधी दिल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक निवडणूक खर्च करण्यात बारामतीतून पराभूत झालेल्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी बाजी मारल्याचे खर्चातील तुलनात्मक तपशिलावरून दिसून येत आहे. पवार यांनी लोकसभा निवडणुकीत ९३ लाख ८९ हजार ७९९ इतका खर्च केल्याचे आयोगाला दिलेल्या हिशोबात दर्शवलेले आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना ९५ लाख रुपये खर्च करण्याची निर्धारित मर्यादा निश्चीत केलेली आहे. निर्धारित मर्यादा असलेली संपूर्ण रक्कमच ९५ लाख रुपये प्रत्येकी चारही उमेदवारांना त्यांच्या निवडणूक खर्च बँक खात्यात थेट वितरीत केली. एकमेव राष्ट्रवादी असा राजकीय पक्ष आहे की सर्वाधिक रक्कम उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी दिलेली आहे. सर्वाधिक खर्च केलेल्यांमध्ये सुनेत्रा पवार यांचा प्रथम क्रमांक आहे. ९० लाखांच्या पेक्षा जास्त खर्च केलेल्या ७ उमेदवारांमध्ये सुनेत्रा पवार, अमरावती लोकसभा मतदारसंघ नवनीत राणा (भाजप) ९२,९३,१६०/-, बळवंत वानखडे (काँग्रेस) ९२,५३,६९७ /-, जालना लोकसभा मतदारसंघ रावसाहेब दानवे (भाजप) ९१,०१,२६८/-, भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ सुनील मेंढे (भाजप) ९०,२१,४१६/-, रामटेक लोकसभा मतदारसंघ राजू पारवे (शिवसेना) ९०,१५,६७०/-, भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ डॉ. प्रशांत पडोळे (कॉंग्रेस) ९०,०३,२३०/- यांचा समावेश आहे. तर, सर्वाधिक कमी निवडणूक खर्च केलेल्यांमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघ वैशाली दरेकर-राणे शिवसेना (उबाठा) ३८,८३,२०९/- इतका केलेला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सर्व चारही उमेदवारांना प्रत्येकी ९५ लाख रुपये त्यांच्या निवडणुकीच्या बँक खात्यात निवडणूक पक्ष निधी वितरीत केला आहे. खासदार सुनील तटकरे यांनी ६५ लाख ५३ हजार ३५९ तर शिवाजी आढळराव यांनी ८६ लाख ६४ हजार ८५३ आणि अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांनी ८८ लाख १२ हजार ६६६ इतका खर्ची केल्याचे निवडणूक आयोगाला अंतिम हिशोबात नमूद केलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने १० पैकी ७ उमेदवारांना निवडणूक पक्ष निधी दिला. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना सर्वाधिक ९५ लाख १ हजार इतका निधी त्यांच्या निवडणूक खर्च बँक खात्यात वर्ग केला. पक्षाने उमेदवारांच्या निवडणूक खर्च बँक खात्यात डॉ. अमोल कोल्हे यांना ७० लाख, बजरंग सोनवणे यांना ६० लाख आणि अमर काळे यांना ५० लाख रुपये तसेच भास्कर भगरे यांना ३५ लाख आणि निलेश लंके यांना ३० लाख रुपये तसेच मोहिते-पाटील धैर्यशील यांना ३० लाख रुपये निवडणूक पक्ष निधी दिल्याचे आयोगाला सादर केलेल्या हिशोबातून दिसून येत आहे. रावेर, सातारा आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना पक्षाकडून काहीही निवडणूक निधी दिलेला नाही असे दिसून येत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाने ६ उमेदवारांना निवडणूक खर्च पक्ष निधी दिलेला नाही. सर्वाधिक पक्ष निधी अनिल देसाई यांना ८५ लाख रुपये इतका दिलेला आहे. तर त्याखालोखाल अनंत गीते आणि विनायक राऊत यांना ७५ लाख, तर संजय दिना पाटील यांना ६० लाख आणि वैशाली दरेकर-राणे, नरेंद्र खेडेकर, भारती कामडी, करण पाटील-पवार, सत्यजीत पाटील सरूडकर, अरविंद सावंत, ओमप्रकाश पवन राजेनिंबाळकर, आष्टीकर पाटील नागेश , अमोल गजानन कीर्तिकर यांना प्रत्येकी ५० लाख रुपये इतका पक्ष निधी दिलेला आहे.
या निवडणुकीत काँग्रेसने कोणत्याही उमेदवाराला निवडणूक पक्ष निधी वितरीत केलेला नाही. केवळ सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांना जिल्हा शाखेतून २ लाख ३१ हजार ९४५ निधी दिलेला आहे. त्यांना देणगी स्वरुपात मदत मिळाली. नंदुरबार मतदारसंघातील पाडवी यांना ५५ लाख ९० हजार तर पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी ५३ लाख ७७ हजार ५०२ इतकी रक्कम निवडणुकीसाठी देणगीतून गोळा केलेली दर्शवलेली आहे.
पराभूत झालेल्या सुधीर मुनगंटीवार यांना भाजपकडून सर्वाधिक निवडणूक पक्ष निधी
लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाकडून निवडणुकीला उमेदवारांना पक्ष निधी वितरीत करताना मंत्री व लोकसभेला पराभवाचा सामना करावे लागलेले सुधीर मुनगंटीवार यांना अन्य उमेदवारांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे ८० लाख रुपयांचा निवडणूक पक्ष निधी दिला आहे. त्यांनी निवडणुकीत ७८ लाख ५४ हजार ०४६ रुपये खर्च केल्याचे दर्शवलेले आहे. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील केंद्रीय मंत्री पियुष गोयल एकमेव उमेदवार आहेत की त्यांना केंद्रीय समिती कडून पक्ष निधी मिळालेला आहे. प्रदेश व केद्रीय पक्षाकडून त्यांना एकूण ७५ लाख रुपये निवडणूक निधी वितरीत केलेला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केवळ ६ लाख रुपये पक्ष निधी दिलेला असून खासदार अनुप धोत्रे यांना ६५ लाख रुपये तर उज्वल निकम, डॉ हिना गावित, डॉ. भारती पवार, रामदास तडस, मिहीर कोटेचा, राम सातपुते, चिखलीकर प्रतापराव, छत्रपती उदयनराजे भोसले, डॉ. सुजय विखे पाटील, भामरे सुभाष रामराव या उमेदवारांना प्रत्येकी ५० लाख रुपये निवडणूक पक्ष निधी भाजपने दिलेला असून उर्वरीत उमेदवारांना काहीही निधी दिला नसल्याचे आयोगाला सादर केलेल्या अंतिम हिशोबावरून दिसून येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील बहुतांश उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी पक्ष निधीचे एकसमान पद्धतीने वाटप केल्याचे आयोगाला सादर केलेल्या तपशिलावरून दिसून येत आहे. निवडणूक खर्चासाठी प्रत्येकी ५० लाख ५ हजार रुपये इतका पक्ष निधी दिलेला आहे.