फसवणूक प्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल; मटण दुकानदारांकडे चक्क ६१ लाखांची उधारी
पुणे | पुण्यातील अनेक हॉटेल शाकाहारी व मांसाहारी जेवणासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र पुण्यातील एक हॉटेल वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. मटणाचे तब्बल ६१ लाखाचे बिल न दिल्याचा आरोप पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलवर होत आहे. पुण्यात तब्बल ६१ लाख रुपयांची मटणाची उधारी न देता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २०१९ ते २०२३ या कालावधीत पुणे कॅम्प येथील छत्रपती शिवाजी मार्केट येथे घडला आहे या प्रकरणी एका प्रसिद्ध हॉटेलच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शादाफ निजाम पटेल (वय ४३ रा. जान मोहम्मद स्ट्रीट, पुणे कॅम्प) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन बागबान हॉटेलचे मालक अफजल युसूफ बागवान (वय-६५ रा. कौसरबाग, कोंढवा), अहतेशाम अयाज बागवान (वय-३४) यांच्यावर आयपीसी ४०६, ४२०, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं ?
फिर्यादी यांचा मटण विक्रीचा व्यवसाय आहे. बागबान हॉटेलच्या मालकाचे फिर्यादी सोबत गेले ३ वर्षांपासून व्यवहार सुरू होते. आणि हॉटेलच्या व्यवसायामध्ये वेंडरकडून आगाऊ मटण घेण्याची पद्धत सगळीकडे चालत असते. त्यानुसार, बागबान हॉटेलच्या मालकाने २ कोटी ९१ लाख ८१ हजार, ८१५ रुपयांचे मटण आणि मटण मधील विवीध प्रकारचा हॉटेल मालकाला पुरवठा केला. मात्र, त्यापैकी २ कोटी, ३० लाख, १९ हजार, ६८५ रुपये हॉटेल मालकाने फिर्यादीला परत केले. मात्र, उर्वरित ६१ लाख, ६२ हजार १४० रुपये थकीत ठेवले. वारंवार पाठपुरावा करूनही आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानुसार, फिर्यादी यांनी लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास लष्कर पोलिस करत आहे.