राष्ट्रसंचार कनेक्ट

खेडमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी

राजगुरुनगर : येथील ऐतिहासिक दिलावर खान दर्गा मैदानावर सकाळी साडेआठ वाजता सामुदायिकरीत्या नमाज अदा करून एकमेकांना ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटाने सणवार साजरे करता आले नाहीत. मात्र या वर्षी शासनाकडून कोणतेही बंधन नसल्याकारणाने ईद साजरी करताना मुस्लिम बांधवांच्या चेहर्‍यावर आनंदाचे वातावरण दिसत होते.


मुस्लिम समाजामध्ये रमजान महिन्याला मोठे महत्त्व प्राप्त असून, महिनाभर प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या घरी धार्मिकतेचे वातावरण दिसून येत होते. त्याबरोबर तीस दिवसांचा उपवास केल्यानंतर शव्वाल महिन्याच्या पहिल्या तारखेस ईद साजरी करण्यात येते. चंद्रदर्शन झाल्यानंतर मुस्लिम बांधव ईदची नमाज अदा करण्यासाठी दर्गाह मैदानावर एकत्र आले होते.


यावेळी जामा मशिदीचे प्रमुख मोहम्मद इर्शाद यांनी रमजानविषयी माहिती विशद करताना सांगितले की, ईदचा आनंद साजरा करताना परमेश्वराला विसरू नका. ईदगाहमधे जा आणि अल्लासमोर नतमस्तक व्हा. खूप दुवा मागा. रमजानचे रोजे करण्याची संधी आणि शक्ती दिल्याबद्दल आभार माना व नमाज अदा करण्यापूर्वी महत्त्वाची आर्थिक उपासना करणे गरजेचे आहे. जेणेकरून ईदच्या आनंदात गरीब लोकांना सामील होता येईल.


यादरम्यान खेड पोलिस स्टेशनकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील, पोलिस निरीक्षक सतीश गुरव व त्यांचे सहकारी यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. तर मुस्लिम समाजाने त्यांचा सत्कार करून आभार मानले. यावेळी मुस्लिम फ्रेंड सर्कल अध्यक्ष रफीक मोमीन, उपाध्यक्ष फैज मोमीन, तालुका मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष इमरान मोमीन, समीर मोमीन, हाफिज मोमीन, मुबीन मोमीन, शफीक मोमीन, मोहसीन पटेल आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये