मराठवाड्यात पावसाची शक्यता, आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा!

औरंगाबाद : परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेलं उभं पिकं गेलं. आता पुन्हा शेतकऱ्यांसाठी दुःखाची गोष्ट समोर आली आहे. कारण पुढील आठवड्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा मोठं संकट उभं राहिलं आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनाही पिकांची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केल्यामुळे त्यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झालं आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने म्हटले आहे की, भारतीय हवामान विभाग यांच्याकडील 9 डिसेंबर रोजीच्या हवामान विषयक पुर्वसुचना नुसार नैऋत्य बंगालच्या उपसागरावर मॅन-डीस चक्रीवादळ गेल्या सहा तासांमध्ये 10 किमी प्रतितास वेगोने वायव्य दिशेला केंद्रस्थानी आहे. तर 9 डिसेंबर पासुन दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावरील पंडुचेरीच्या किनाऱ्यापासुन जवळजवळ वायव्येकडे सरकुन 75 ते 85 किमी प्रतितास वेगोने उत्तर तामिळनाडू ओलांडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
या हवामानाच्या परिस्थितीमुळे 10 डिसेंबर पासुन पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हयासह इतर जिल्हयांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानुषंगाने औरंगाबाद जिल्हयातील सर्व प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.