महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; केसीआर-आंबेडकर एकत्र ?
पुणे | Maharashtra Politics – भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) (K. Chandrashekar Rao) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी एकत्र येण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा मंगळवारी पुणे दौरा झाला. लोकमान्य टिळक पुरस्काराच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मोदी एकाच व्यासपीठावर आले होते. या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती दिशा मिळते, याकडे लोकांचे लक्ष लागले होते. प्रसारमाध्यमांचे कॅमेरेही याच एका घटनेकडे नजर लावून बसले होते. त्याच सुमारास मंगळवारी के. चंद्रशेखर राव, भारत राष्ट्र समिती या आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी महाराष्ट्रात आले होते. त्यांनी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन पूजा केली आणि सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे जाऊन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमात सहभाग घेतला. उत्तुंग प्रतिभेने देशविदेश गाजवणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न किताब देण्यात यावा, अशी मागणी केली.
केसीआर यांच्या दौऱ्यात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील सहभागी झाले. त्यांनी भारत राष्ट्र समितीला पाठिंबा दिला. ‘अब की बार, किसान सरकार’, अशी घोषणा देणाऱ्या राव यांच्यासाठी बेरजेचे राजकारण जमून आले. लोकसभा, विधानसभेच्या मागील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि ओवेसी यांचा एमआयएम पक्ष एकत्र आले होते. त्याचा परिणाम काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या मतांवर झाला आणि काही मतदारसंघात पराभवाचा फटका बसला होता. आंबेडकर -ओवेसी युती म्हणजे भाजपची बी टीम आहे अशी टीका काँग्रेस पक्षाने केली होती. त्याच पद्धतीची टीका सध्या काँग्रेस पक्षाकडून भारत राष्ट्र समितीवर करण्यात येत आहे. शिवसेना (उबाठा) आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येईल अशा घोषणा झाल्या आहेत. नव्या राजकीय समीकरणात या घोषणेचे काय होणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष आहे.
बीआरएस महाराष्ट्रात पसरतेय
आषाढी एकादशीच्या निमित्ताने केसीआर आपल्या मंत्रिमंडळासह श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला आले होते. त्यांचा पंढरपूर दौरा राजकीय क्षेत्रात गाजला. तेलंगणाच्या नजीकच्या नांदेड जिल्ह्यापासून सभा घेत आणि नेते कार्यकर्ते जमा करीत के.चंद्रशेखर राव महाराष्ट्रात हातपाय पसरू लागले आहेत. केसीआर आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे राजकीय संबंध काही वर्षांपासून आहेत. तेलंगणामधील विविध योजनांची पाहणी आंबेडकर यांनी केलेली आहे. आता मैत्रीचे एक पाऊल पुढे टाकून दोन्ही नेते महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र येण्याची शक्यता आहे.