“मी आता पुण्याचा पालकमंत्री नाही, मात्र…” पालकमंत्रिपद गेल्यानंतर चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच बोलले
पुणे | जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी अजित पवार (Ajit Pawar) , तर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना अमरावती आणि सोलापूर जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. एकीकडे पाटील यांची उचलबांगडी केल्याची चर्चा असताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले ‘मी आता पुण्याचा पालकमंत्री नाही. मात्र, पुणे जिल्ह्यातील मंत्री असल्याने सहपालकमंत्री आहे. त्यामुळे पुण्यातील विकासकामांचा दर दोन महिन्यांनी प्रशासकीय आढावा घेणार आहे,’ असे सांगत आता चंद्रकांत पाटील यांनीही ‘मी पुन्हा येईन’ असे वरिष्ठ अधिकाऱ्यांना बजावले.
दरम्यान, अजित पवार हे राज्यातील सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील विकासकामांबाबत बैठकांचा सपाटा लावला आहे. आता ते पालकमंत्री झाल्याने पुण्यावर त्यांचाच वरचष्मा राहणार असल्याची चर्चा आहे. मात्र, नियमानुसार पाटील हे कोथरूडचे लोकप्रतिनिधी असून, त्यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण खाते आहेत. त्यामुळे ते आता पालकमंत्री नसले, तरी जिल्ह्याचे ‘सहपालकमंत्री’ म्हणून कायम राहणार आहेत. तसेच लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार विकासकामांच्या निधीवाटपाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे गुणोत्तर निश्चित करणार आहेत. परिणामी पवार यांना पुण्यात मनमानी पद्धतीने कारभार हाकता येणार नाही, असेच पाटील यांनी गुरुवारच्या बैठकीत स्पष्ट केले.