‘…चंद्रकांत पाटलांनी मला भाजपाची ऑफर दिली’- वसंत मोरे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहुचर्चित उत्तरसभी सभा आज ठाण्यात पार पडत आहे. गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे न काढल्यास त्यांच्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन केलं होतं. तसंच राज ठाकरे यांच्या या भाषणावर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. यादरम्यान आज होत असलेल्या उत्तरसभेत या सर्व मुद्द्यांना राज ठाकरे उत्तर देणार आहेत. यामुळे या सभेला ‘उत्तरसभा’ असं नाव मनसेकडून देण्यात आलं आहे. तसंच याच सभेत काही दिवसांपासून चर्चेत असलेले पुण्यातले पक्षाचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरेही उपस्थित आहेत.
वसंत मोरे यांनी या सभेत बोलताना, आपल्याला चंद्रकांत पाटलांनी भाजपाची ऑफर दिली असल्याचं सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, ”ज्यावेळी मला चर्चेतला चेहरा हा पुरस्कार दिला, तेव्हा तो पुरस्कार देताना त्या ठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे होत्या. चंद्रकांत पाटलांनी मला पाहिलं आणि मला पाहिल्यानंतर ते म्हणाले, अरे तुम्ही भाजपात या. तुम्ही नगरसेवक व्हाल. मी त्यांना एकच शब्द बोललो, दादा पंधरा वर्षं भाजपाच्याच नगरसेवकांना पाडून मी नगरसेवक होतोय. इतकं चांगलं काम आम्ही त्या भागात करतो”.