“…तर गळ्यात बोर्ड लटकवून उभे राहा”, चंद्रकांत पाटलांचा जितेंद्र आव्हाडांना खोचक सल्ला

मुंबई | Chandrakant Patil On Jitendra Awhad – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना माॅलमध्ये सुरू असलेला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण देखील करण्यात आली होती. त्या प्रकरणी ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी आव्हाडांना अटक केली आहे. यासंदर्भात बोलताना भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जितेंद्र आव्हाडांवर सडकून टीका केली आहे.
“एखादा चित्रपट तुम्हाला आवडला नाही तर सिनेमागृहाबाहेर गळ्यात बोर्ड लावून उभे राहा आणि चित्रपट पाहू नका असं सांगा. या आवाहनाला ज्यांना प्रतिसाद द्यायचा असेल ते देतील”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. कायदा हातात घेतल्यानंतर जी शिक्षा व्हायची ती होणारच, असंही पाटील म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “तुम्हाला एखादा विषय आवडला नाही. हा संघर्षाचा विषय आहे का? असा सवाल पाटलांनी आव्हाडांना विचारला आहे. तसंच सरकार सत्तेतून गेल्याचं सहन होत नसल्यानं रोज उठसूठ संघर्ष करण्याचा आव्हाड प्रयत्न करत आहेत, अशी टीकाही चंद्रकांत पाटलांनी केली आहे.