शिंदे-फडणवीस सरकारच्या पुढाकारामुळे ओबीसीनंतर मराठा, धनगर आरक्षणाचाही प्रश्न लागणार मार्गी?

मुंबई : (Chandrakant Patil On Press Conference OBC Reservation) बुधवार दि. 20 रोजी ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला. यामुळे राज्यातील सरकारचा आत्मविश्वास वाढला आहे. या निकालामुळं राज्यभरातील स्थानिक पातळीवरील ओबीसी नेते कार्यकर्ते यांनी मोठा दिलासा मिळाला आहे. आरक्षणानुसारच आगामी काळात निवडणुका लवकर घेण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, निर्णयाचं भाजपकडून फटाके फोडून तसेच पेढे वाटप करून जल्लोष करण्यात आलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही कोर्टाच्या निर्णायचं स्वागत केले. तसेच शिंदे – फडणवीस सरकारच्या पुढाकारामुळं ओबीसींना तर आरक्षण मिळालेच पण, येत्या काळात मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, अनुसूचित जाती – जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण हे प्रश्नही सुटतील, असा विश्वास चंद्रकांत पाटीलांनी व्यक्त केला.
सर्वोच्च न्यायालयानं काही त्रुटी सुधारायाच्या सांगूनही योग्य वेळी ते झालं नाही. त्यामुळं महाविकास आघाडी सरकारनं राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण गमावलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आपण आभार मानले. पाटील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.