“मी एक वडील म्हणून तुझ्याकडे भीक मागतो, माझ्या मुलाला…”, समीर वानखेडेंच्या याचिकेत मोठा खुलासा

मुंबई | Sameer Wankhede – सध्या एनसीबी मुंबई झोलनचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. समीर वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणात (Aryan Khan Case) शाहरूख खानकडे (Shah Rukh Khan) 25 कोटींची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल करत कारवाईला सुरूवात केली आहे. तसंच सीबीआयनं समीर यांना चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. पण समीर वानखेडेंनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. त्यानंतर दिल्ली हायकोर्टानं त्यांना दिलासा देत मुंबई हायकोर्टात दाद मागण्याचे निर्देश दिले आहेत.
तसंच आता समीर वानखेडेंनी मुंबई हायकोर्टात रिट याचिका दाखल केली आहे. नुकताच या याचिकेत मोठा खुलासा झाला आहे. आर्यन खानला अटक झाल्यानंतर समीर वानखेडे आणि शाहरुख खान एकमेकांच्या संपर्कात होते. तसंच आता त्या दोघांमध्ये झालेलं संभाषण समोर आलं आहे. या संभाषणात शाहरुखनं मुलगा आर्यनला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांच्याकडे विनंती केल्याचं समोर आलं आहे.
या संभाषणात शाहरूख खाननं म्हटलं आहे की, प्लीझ मला कॉल कर. आर्यनचा वडील म्हणून मी तुझ्याशी बोलेन. तू एक चांगला माणूस आहेस आणि एक चांगला पतीदेखील आणि मी सुद्धा. कायद्यामध्ये राहून मी माझ्या कुटुंबासाठी तुझ्याकडे मदत मागत आहे. तुझ्याकडे मी भीक मागतो, माझ्या मुलाला जेलमध्ये जाऊ देऊ नको. माणूस जेलमध्ये गेल्यानंतर खचून जातो. मला तू प्रोमिस केलेलंस की तू माझ्या मुलाला बदलून टाकशील. माझ्या मुलाला प्लीझ घरी पाठव, मी तुझ्याकडे एक वडील म्हणून भीक मागत आहे. यावर समीर वानखेडे म्हणाले, शाहरुख मी तुला एक चांगला माणूस म्हणून ओळखतो. जे होईल ते चांगलंच होईल. तू तुझी काळजी घे.
दरम्यान, या दोघांमधल्या संभाषणात एक गोष्ट समोर आली ती म्हणजे, दोन्ही बाजूने सकारात्मक पद्धतीने संभाषण सुरु होतं. त्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं खंडणीची मागणी करण्यात आलेली नसल्याचं दिसून येतंय. तसंच हे संभाषण समीर वानखेडेंनी आपल्या याचिकेत जोडलं आहे.