राज्यात नवीन वर्णव्यवस्था यायला लागलीय : छगन भुजबळ
पुणे | Chhagan Bhujbal : आता राज्यात नवीन वर्णव्यवस्था यायला लागली. ही वर्णव्यवस्था वेगळी, आधीची वेगळी होती. आता लायकी काढली जातेय, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर निशाणा साधला. महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त पुण्यातील महात्मा फुले वाड्यात आयोजित कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. यावेळी छगन भुजबळांनी नागपुरातील दलित तरुणाला झालेल्या मारहाणीवर देखील भाष्य केले.
यावेळी भुजबळ म्हणाले की, रामटेकमधे फक्त दलित आहे म्हणून मारहाण झाली आणि एक मृत्युमुखी पडला. यावरून लक्षात येते की, आपल्याला आणखी किती काम करायचे आहे. अजूनही लहान-मोठा हा फरक केला जातो. प्रत्येकाने महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्याबद्दलची पुस्तके वाचली पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची पुस्तके तर वाचलीच पाहिजे.
महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शाहू महाराज अशा वेगवेगळया वैचारिक छावण्यांमधील लोकांनी महात्मा फुलेंना गौरवले. भिडे वाड्याचे काम मार्गी लागेल असे वाटते. महात्मा फुलेंच्या या वाड्याच्या आजूबाजूला स्मारक उभारणीसाठी काम होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्हाला आंदोलन करायला लागणार नाही, असे वाटते.
पुढे ते म्हणाले, आता राज्यात नवीन वर्णव्यवस्था यायला लागली. ही वर्णव्यवस्था वेगळी, आधीची वेगळी होती. आता लायकी काढली जातेय. काही दिवसांपूर्वी वाटले होते की वर्णव्यवस्था संपली. पण उष:काल होता होता काळरात्र झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. मी कुठल्या समाजाच्या विरोधात नाही. कुठल्याही समाजाच्याविरोधात कोणी असू नाही. सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे, पण अन्याय होत असेल, तर तो सहन देखील केला नाही पाहिजे, असे भुजबळ म्हणाले.