मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? छगन भुजबळ म्हणाले, “तिन्ही नेत्यांमध्ये…”
मंत्रिमंडळ स्थापनेच्या पद्धतींवर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा केली जाईल. यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना करत महायुतीतील मित्रपक्षांचे मंत्री आठवडाभरात शपथ घेतील, अशी शक्यता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
भुजबळ म्हणाले, राज्यात आनंदाचे वातावरण आहे. कारण १९८५ साली मी पहिल्यांदा आमदार झालो, तेव्हापासून मी विधिमंडळात आहे. तेव्हापासून इतकं मोठं बहुमत सरकारी पक्षाला मिळाल्याचे मी पहिल्यांदाच पाहतो आहे.
अशा बहुमतासाठी लोकांची मने जिंकावी लागतात. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे तीन प्रमुख नेते आहेत. ते तीन जण एकत्र आले की तिन्ही पक्ष एकत्र आल्याचा संदेश जाईल. प्रत्येक पक्षाचे किती मंत्री आणि कोणती खाती मिळणार याची चर्चा सुरू आहे. येत्या आठ दिवसांमध्ये इतर मंत्र्यांचादेखील शपथविधी होईल, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबद्दल भुजबळ म्हणाले, एखाद्याचे मंत्रीपद गेले की तो नाराज होतो, हे स्वाभाविक आहे. जर एखाद्याचे मुख्यमंत्रीपद गेले आणि उपमुख्यमंत्रीपदावर काम करायला सांगितले तर कोण नाराज होणार नाही? हा मानवी स्वभाव आहे, मी देखील नाराज झालो असतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
भुजबळ म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे पाच वर्ष मुख्यमंत्री होते. १०५ आमदार असताना एकनाथ शिंदे ४० आमदार घेऊन आले. यावेळी सगळ्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे वाटले होते. पण वेगळंच झाले, शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी फडणवीसांनी सांगितले होते की, मी बाहेर राहून सरकारला पूर्णपणे पाठिंबा देणार, परत वरून आदेश आला की तुम्ही सरकारमध्ये सामिल व्हा आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करा. त्यांना थोडं दुःख तरी झालचं असेल. त्यांनी त्या आदेशाचे पालन केले. त्यांचे नाराज होणे चूक म्हणत नाही. पण वास्तविकता काय आहे हे आपल्याला पाहवेच लागते, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.