“…अशा लोकांना देशात राहण्याचा अधिकार नाही”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य!

नाशिक | CM Eknath Shinde – गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि इतर काही संघटनांवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. पीएफआय संघटनेवर दहशतवादी आणि देशविरोधी कारवाया केल्याचा ठपका तपास यंत्रणांनी ठेवला आहे. त्यामुळे गृहमंत्रालयाने त्यावर आध्यादेश काढत बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पीएफआय संस्थेवरील कारवाईचं समर्थन केलं आहे. “पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा देणारे देशासाठी धोकादायक आहेत. म्हणून अशा लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे”, असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं आहे. ते आज (28 सप्टेंबर) नाशिकमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.
“पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देणारे देशासाठी धोकादायक आहेत. म्हणून अशा लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे. अशा घोषणा देणाऱ्यांना या देशात राहण्याचाच अधिकार नाही. त्यामुळे पीएफआयवर बंदी घातली ती योग्य आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “या राज्यात, देशात कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणं खपवून घेतलं जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे”, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.
“केंद्राचा आणि राज्याचा गृहविभाग दोघांचंही यावर बारीक लक्ष आहे. या देशात राष्ट्रद्रोही, देशद्रोही विचार कुणालाही पसरवता येणार नाही आणि पसरवू दिले जाणार नाहीत,” असंही त्यांनी म्हटलं आहे.