सततचा पाऊस, ढगाळ हवामान, दुपारी उकाडा आणि रात्री गारवा अशा संमिश्र वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यातच पावसाच्या पाण्याने रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. याच पाण्यात ‘एडीस इजिप्ती’ डासांची पैदास होत असल्याने शहरातील अनेक भागांमध्ये ताप, डेंगी, झिका आणि चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून येत आहेत.
झिका, डेंगी आणि चिकुनगुनियामुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. साथीच्या आजारांसह विषाणूजन्य जंतूंचा संसर्ग वाढत असल्याने आजार बळावत असून, काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. शहरामध्ये साथीच्या आजारांचा प्रसार वेगात होत आहे. त्यामुळे दवाखान्यांमध्ये गर्दी वाढलेली दिसून येत आहे.
शहरात आजपर्यंत सुमारे १०७ पेक्षा जास्त डेंगीचे रुग्ण आढळून आले आहेत. झिकाचे ९४ तर चिकुनगुनियाचे ६८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
शहरात झिका, डेंगी आणि चिकुनगुनियाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. रक्तांचे नमुने तपासणीसाठी देण्याचे प्रमाणही अल्प आहे. हे आजार जास्त काळ राहत नाही. त्यामुळे रुग्णाचा ‘व्हायरल लोड’ कमी झाल्यावर तपासणीत रुग्णांना आजार असल्याचे कळणे कठीण असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरात या आजाराचे रुग्ण कमी नोंदवले जाण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. चिकुनगुनियावर स्वतंत्ररीत्या कुठलीही लस उपलब्ध नसल्याने प्रतिबंधात्मक उपचारावर भर दिला जावा, असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
इथे होते डासांची उत्पत्ती
पाण्याचे पिंप, फुलदाण्या, नारळाच्या करवंट्या, जुने टायर, डबकी आदींमध्ये साचलेल्या पाण्यात डेंगी आणि चिकुनगुनिया पसरवणाऱ्या ‘एडीस इजिप्ती’ डासांच्या अळ्या वाढतात. मानवी वस्तीतच हे डास असल्याने रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. झोपडपट्ट्यांमध्ये साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो. असे असताना देखील या भागात वारंवार औषध फवारणी वेळेवर होत नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे या भागात महापालिकेद्वारे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जाव्यात, अशी मागणी नागरिकांद्वारे होत आहे.
लहान मुलांसह ज्येष्ठांना जास्त त्रास
साथीच्या आजारांचा सर्वाधिक परिणाम पाच वर्षाखालील मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. यामुळे त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांमध्ये जुलाब होणे, लिव्हरवर सूज येणे, मेंदुज्वर होणे, गिलोय बैरी सिंड्रोम यांसारखे गंभीर आजार देखील यामुळे होत आहेत. यासह उच्च मधुमेह, रक्त दाब असलेल्या ज्येष्ठांमध्ये याची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे या परिस्थितीत लहान मुलांसह ज्येष्ठांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
दवाखान्यांमध्ये गर्दी
औंध रस्ता, बोपोडी, औंधगाव, आनंदनगर, चव्हाण वस्ती, कांबळे वस्ती, विश्रांतवाडी, पाटील इस्टेट, पर्वती, गणेशमळा आदी भागांमध्ये विषाणूजन्य आणि साथीच्या आजारांचा प्रभाव अधिक दिसून येत आहे. त्यामुळे या भागातील महापालिकेच्या रुग्णालयांसह लहान-मोठी सर्व रुग्णालये गर्दीने भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
- १०७ – पेक्षा अधिक डेंगीचे रुग्ण
- ९४ – झिकाचे रुग्ण
- ६८ – चिकुनगुनियाचे रुग्ण
- १७८० – नागरिक, स्थांना महापालिकेची नोटीस
महापालिकेच्या उपाययोजना
शहरात झिका, डेंगी, आणि चिकुनगुनिया या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. महापालिकेतर्फे डासउत्पतीची ठिकाणे शोधून त्यावर औषध फवारणीसाठी २०६ कर्मचारी नियुक्त केले आहेत.
यामध्ये १५ मेडिकल अधिकारी आणि १५ मलेरिया निरीक्षण निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महापालिकेतर्फे आतापर्यंत एक हजार ७८० नागरिक आणि संस्थांना नोटीस देण्यात आली असून सहा लाख ५५० रुपये इतके प्रशासकीय शुल्क आकारण्यात आले आहे.
हे आहेत प्रतिबंधात्मक उपाय
- घरातील फुलदाण्या, टेरेस गार्डनमधील कुंड्यांमध्ये पाणी साठू देऊ नये
- घरात फ्रिज, एसीमधील पाणी स्वच्छ करत राहावे
- घरात पाणी साठवलेली भांडी स्वच्छ ठेवावीत
- घराभोवती खड्डे ठेवू नयेत, खिडक्यांना जाळ्या बसवून घ्याव्यात
- मॉस्किटो रिपेलेंट्स वापरणे
- घराच्या परिसरात पाणी साठणार नाही याची दक्षता घेणे
- लांब बाह्यांचे कपडे वापरणे
लक्षणे आजाराची, रिपोर्ट निगेटिव्ह
ताप येणे, अंग दुखणे, अंगावर पुरळ येणे यासह पेशींची संख्या कमी होणे आदी सर्व लक्षणे ही डेंगी आणि चिकुनगुनिया या आजारांची आहेत. मात्र तपासणी केल्यानंतर रिपोर्ट निगेटिव्ह येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. तसेच या नागरिकांची संख्या देखील नोंदविली जात नसल्याने महापालिकेद्वारे दिली जाणारी आकडेवारी कमी असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
आहारही महत्त्वाचा
- शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवावी
- सकाळी, सायंकाळी नारळ पाणी प्यावे
- आहारात हिरव्या पालेभाज्यांचा वापर करावा
- गाजर, टोमॅटोचे सूप घ्यावे
- पपईच्या पानांचा रस पिल्याने शरीरातील कमी झालेल्या रक्तपेशींची संख्या वाढण्यास मदत होते
- हलका आहार घ्यावा
आजाराची लक्षणे
- थंडी वाजून ताप येणे
- गुडघा दुखणे
- तीव्र सांधेदुखी
- सांध्यांची हालचाल वेदनादायी होणे
- डोकेदुखी
- स्नायू दुखणे
- अंगावर पुरळ येणे
- मळमळ होणे
स्वच्छतेबाबत महापालिकेकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. ठिकठिकाणी कचरा आणि घाणीची समस्या आहे. मंगळवार पेठ भागात आजाराची मोठी साथ आहे. त्यामुळे महापालिकेद्वारे उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. मात्र ज्या घरामध्ये डेंगी किंवा चिकुनगुनियाचा रुग्ण आढळला आहे, फक्त अशा घरांमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये औषध फवारणी केली जाते.
– महानंदा दाळिंबे, रहिवासी, मंगळवार पेठ
या वर्षी चिकुनगुनियाने जोम धरला आहे. या आजाराची लक्षणे तीन ते चार आठवड्यांपर्यंत राहात आहेत. गर्भवती स्त्रियांना चिकुनगुनिया आजाराची लागण झाल्यास नवजात अर्भकांमध्ये संक्रमित होण्याची शक्यता असते. तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाचे आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना चिकुनगुनिया झाल्यास आजाराची तीव्रता वाढते.
– डॉ. अमित द्रविड, साथरोगतज्ज्ञ
आरोग्य विभागातर्फे उद्रेकग्रस्त भागामध्ये नियमितपणे चाचणी केली जात आहे. डासउत्पतीची ठिकाणे शोधून त्यावर औषध फवारणीसाठी २०६ कर्मचारी नियुक्त केले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनाही राबविल्या जात आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी.