
अभ्यास हा शब्द सगळ्याच घरांमध्ये सतत कानावर पडत असतो. विशेषतः ज्या घरामध्ये शाळेत जाणारी मुले आहेत, तिथे तर सातत्याने अभ्यास कर, अभ्यास झाला का, शाळेतून येताना अभ्यास लिहून आणलास का ? आज ताईंनी काय अभ्यास दिला आहे, असे एक ना अनेक प्रश्न अभ्यासासंबंधी विचारले जातात. पालकांच्या या रोज विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांनी बहुतांश मुले कंटाळलेली असतात.
हा ‘अभ्यास’ म्हणजे नक्की काय? हे मुलांना आणि त्यांच्या पालकांना माझ्याबरोबरच, आपल्या सगळ्यांना तरी समजले आहे का? माझ्या मते तरी काही प्रमाणात समजले असेल, पण १००% नाहीच. प्रश्नोत्तरे लिहिणे, पाढे पाठ करणे, वाचन करणे, गणित सोडवणे इत्यादी म्हणजेच अभ्यास का ? आणि हे सगळं केलं म्हणजेच मूल अभ्यासू आणि हुशार असतं का? व्यवस्थित विचार केला तर हा अभ्यासाचा एक भाग असू शकतो. पण फक्त हे करणं म्हणजेच अभ्यास अस असू शकत नाही.
मुळात संकल्पना स्पष्ट होणे त्या समजून घेऊन त्याचा सराव करणे, समजलेली गोष्ट आपण आपल्या दैनंदिन जीवनात कशी उपयोगात आणू शकतो याचा विचार करणे, शिकलेल्या गोष्टीत आपण आपण स्वतः नवीन काय काय, करू शकतो, यासाठी प्रयत्नशील असणे, या आणि अशा अनेक गोष्टी म्हणजे अभ्यास असं आपण म्हणू शकू.
अभ्यास करायला तसा कोणालाच मनापासून आवडत नाही. बोटावर मोजण्याइतकी काही मुलं सोडली, तर सर्वसाधारणपणे मुलांना हा पठडीबद्ध अभ्यास, करायला आवडत नाही. त्यामुळेच पालक जेव्हा मुलांना हा तोच तो अभ्यास करायला सांगतात तेहा स्वाभाविकपणे मुलांचा त्याला नकार असतो. ते फारसे उत्सुक असतात, टाळाटाळ करतात, कारणं सांगतात असंच चित्र साधारणपणे सगळीकडे दिसतं.
खरं पाहिलं, तर पालक म्हणजे आपण मोठी माणसं तरी आपल्याला न आवडणारं, न पटणारं काम किती आवडीने आणि मनापासून करतो? मग तीच अपेक्षा आपण आपल्या मुलांकडून कशी काय करू शकतो! मुलांनी तर शाळेत जे शिकतो आहोत त्याचा अभ्यास शाळेत पण करायचा, शिकवणीला जातात तिथं जाऊन तोच अभ्यास करायचा आणि घरी येऊन पण तोच अभ्यास करायचा, हे सगळं फारच कंटाळवाणं नाही का? अभ्यासाबाबतीत येणारा हा तोच तोपणा कंटाळा टाळण्यासाठी जसे शाळेकडून प्रयत्न होणं गरजेचं आहे, तसंच पालकांनीही त्या बाबतीत काळजी घेणं, प्रयत्न करणं आवश्यक आहे.
सगळ्यांत आधी करण्यासारखी गोष्ट म्हणजे मुलांच्या वेळेचे नियोजन. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मुलांच्या दिवसभराच्या सगळ्या गोष्टींचं नियोजन पालकांनी मुलांबरोबर बसून करणे गरजेचे आहे. प्रत्येक मुलाच्या आवडीनिवडी, सवयी, वेगवेगळ्या असतात. त्या सगळ्यांचा विचार करून दिवसभरात मिळणारा वेळ याचं गणित मुलांसमोर मांडणं आवश्यक आहे.
सकाळी मूल किती वाजता उठतं? त्याची झोप पूर्ण होते का? इथपासून ते रात्रीपर्यंत मूल किती दमून जातं? त्याने किती वाजता झोपणं गरजेचं आहे? हे सगळं नियोजन मुलांच्या समोर व त्यांच्या सहमतीने करणे गरजेचे आहे. यामध्ये विशेषतः अभ्यासाचे नियोजन असणे आवश्यक आहे, शाळेतून रोज मिळणारा अभ्यास, त्यासाठी लागणारा वेळ, स्वतःच्या मुलाची काम करण्याची, लेखनाची क्षमता व गती या सगळ्यांचा विचार त्यामागे होणे आवश्यक आहे शाळेतून मिळणारा घरचा अभ्यास हा मुलांनी त्यांचं त्यांनी समजून घेऊन करणे अपेक्षित आहे.
(जर शाळेत सगळ्या संकल्पना स्पष्ट झाल्या असतील तर). पण तरीही घरात मूल अभ्यास करायला बसले, तर त्याला न येणारी किंवा अवघड वाटणारी गोष्ट समजावून घेण्यासाठी पालकांनी मदत करायला हवी. पण मदत करताना मुलांना आपण कोणतीही उत्तरं तयार ( रेडीमेड ) देत नाही ना, याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. मुलांनी एखादा प्रश्न विचारला, तर त्यावर चर्चा करत आपण काही प्रश्न विचारत, त्या उत्तरापर्यंत पोचणं आवश्यक आहे.
मुलांशी होणाऱ्या चर्चेत पालकांनी कमीत कमी बोलणं, मुलांना जास्तीत जास्त बोलण्याची संधी देणं या गोष्टी कटाक्षाने करायला हव्यात. अभ्यासातली एखादी गोष्ट, प्रयोग, तू स्वतः करून बघ, त्यावरील निरीक्षणे तू स्वत: कर अशी संधी मुलांना द्यायला हवी. ज्या विषयाचा, घटकाचा अभ्यास मूल करते आहे त्यातील संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत का, व्यवस्थित समजल्या आहेत का, हे देखील पालकांनी एकदा तपासून बघणे गरजेचे आहे.
एखाद्या गोष्टीबद्दल मुलाला त्यांचे स्वतःचे मत मांडता यावे, यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवा. मराठी विषयातील काम करताना अक्षराचे वळण, लेखनातील शुद्धता हेदेखील तपासणे आवश्यक आहे. तसेच त्यामध्ये काही चुकले असेल तर चूक असे न म्हणता ते परत एकदा तपासून बघशील का, असा दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे.
तसेच पालक जो वेळ मुलांना देत आहेत तो पूर्णपणे मुलांसाठीच असणे आवश्यक आहे आपण. ज्याला quality time म्हणतो तो, त्यामध्ये मुलांशी अनेक विषयांवर चर्चा, त्यावरील आपलं मत, मुलाचं मत त्यावरील उपाययोजना अशा अनेक पैलूंवर बोलणे होणे गरजेचे आहे. घरातील अनेक कामांत मुलांना सहभागी करून घेणे, ती कामं करणं का आवश्यक आहे, यावरही बोलायला हवं. आपण करत असलेल्या कोणत्याही कामात सर्जनशीलता (creativity) कशी आणता येईल याचा जास्तीत जास्त प्रयत्न कसा करता येईल याकडे कल हवा आहे.
निसर्गात फिरायला जाणे, वेगवेगळी प्रदर्शनं बघायला जाणे, अनेक कार्यक्रम बघायला जाणे, ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देणे बघितलेल्या ठिकाणांबाबत चर्चा करणे, माहिती मिळवणे अशा अनेक प्रकारचे अभ्यास पालक मुलाबरोबर करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुलं जी कामं स्वतः आवडीने व जबाबदारी घेऊन करतात त्यामध्ये त्यांना प्रोत्साहन देणे, कौतुक करणे, नकारात्मक प्रतिक्रिया न देता, आनंदाने स्वीकारले, तरच तो अभ्यास आनंददायी होईल.