भयानक! सोसायटीत खेळणाऱ्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याचा हल्ला
पुणे | रस्त्यावर मोकाट फिरवणाऱ्या जनावरांमुळे अनेक अपघात झाल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. अनेकदा मोकाट कुत्र्यांनी, प्राण्यांनी हल्ला केल्याच्याही घडल्या आहेत. असाच काळीज पिळवटून टाकणारा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. हांडेवाडी येथील कुमार पेबल पार्क हाऊसिंग सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकला जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या कुत्र्यांमुळे सोसायटीमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आलं आहे.
या हल्ल्यानंतर महापालिकेचं श्वान पथक दाखल झालं मात्र त्याच सोसायटीतील एका प्राणीप्रेमी महिलेने कुत्र्यांना महापालिकेकडे सोपवण्यास नकार दिला आहे. मात्र याच कुत्र्यांच्या हल्ल्याने अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागल आहे. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांनी महिलेवर संताप व्यक्त केला आहे. या भटक्या कुत्र्यांमुळे सोसायटीच्या आवारात मुलांना खेळता येत नाही शिवाय वयस्कर नागरिकांनादेखील या भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात एखाद्याचा नाहक बळी जाण्यापूर्वी कुत्र्याचा योग्य बंदोबस्त करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. श्वानफिडर आणि भटक्या कुत्र्यांची संख्या या दोन्हींवर तातडीने आणि निर्णायक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी महापालिकेला केली असून, रहिवाशांना होणारा धोका लक्षात घेता त्यांनी पालिकेला विनंती केली आहे.